औरंगाबाद : जिल्ह्यात शीतलहर असतानाही तब्बल ४८ वाड्या, वस्त्यांतील पावणेदोन लाख ग्रामस्थांना खाजगी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. कन्नड, फुलंब्री, सिल्लोड व सोयगाव वगळता उर्वरित पाचही तालुक्यांत टँकर सुरू झाले आहेत. जिल्ह्यात सध्या ६४ खाजगी व एक शासकीय, अशा ६५ टँकरद्वारे ४८ गावांतील १ लाख ७१ हजार २९५ ग्रामस्थांना पाणीपुरवठा केला जात आहे. हे ६५ टँकर दररोज १,७१९ किलोमीटरची जा-ये करून १३७ खेपांद्वारे ग्रामस्थांची तहान भागवीत आहेत. आगामी काळात गावांची संख्या १०६४ पर्यंत वाढणार सध्याची पाणीटंचाई लक्षात घेता नवीन वर्षात जानेवारी ते जून या सहा महिन्यांत तहानलेल्या गावांची संख्या १०६४ व वाड्यांची संख्या ६२ पर्यंत वाढण्याची शक्यता प्रशासनाने वर्तविली आहे. त्या गावाच्या पाणीपुरवठ्यासाठी प्रशासनाने २,४५८ योजना तयार ठेवल्या आहेत. या कालावधीत टँकरने पाणीपुरवठा करण्यासह विविध उपाययोजनांसाठी ४५ कोटी ५२ लाख ८७ हजार रुपये खर्च येण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. त्यानुसार संभाव्य पाणीटंचाई निवारणार्थ करायच्या उपाययोजनांचा कृती आराखडाही प्रशासनाने तयार केला आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता गजानन रबडे यांनी दिली.
कुडकुडत्या थंडीत घशाला कोरड
By admin | Updated: December 22, 2014 00:06 IST