जालना : विधानसभा मतदारसंघात अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत २९६ मताधिक्याने शिवसेनेचे उमेदवार अर्जुन पंडितराव खोतकर यांनी काँग्रेसचे उमेदवार कैलास किशनराव गोरंट्याल यांचा पराभव केला. भाजपाचे अरविंद बाजीराव चव्हाण यांनी ३७ हजार ५९१ तर बसपाचे अब्दूल रशीद अजीज यांनी ३६ हजार ३५० मते घेऊन अत्यंत चुरशीची लढत दिली. टपाल मतपत्रिकांची तसेच अंतिम फेरीची दुबार मोजणी झाल्याने निवडणूक निर्वाचन अधिकारी मंजुषा मुथा यांनी सायंकाळी ५ वाजता निकाल जाहीर केला. आयटीआयच्या सभागृहात सकाळी ८ वाजता मतमोजणीस प्रारंभ झाला. पहिल्या फेरीपासून सेनेचे खोतकर यांनी आघाडी मिळविली होती. सहाव्या फेरीपर्यंत खोतकर हे प्रतिस्पर्धी गोरंट्याल यांच्यापेक्षा ९१३ मतांनी आघाडीवर होते. मात्र सातव्या फेरीपासून खोतकर पिछाडीवर पडले. या फेरीपर्यंत गोरंट्याल यांना १४ हजार ७१४ तर खोतकर या १४ हजार २८८ मते मिळाली होती. चव्हाण यांना १२ हजार ७५९ तर अब्दूल रशीद यांना १० हजार ५६२ मते मिळाली होती. गोरंट्याल, खोतकर, अब्दूल रशीद आणि चव्हाण यांच्यातील मतांचा चढउतार सुरू होता. बाराव्या फेरीत गोरंट्याल यांना २५ हजार ५५५, रशीद यांना २३ हजार १६६, चव्हाण यांना २२ हजार ३७१ तर खोतकर यांना २० हजार ८८३ मते मिळाली. गोरंट्याल यांची आघाडी २१ व्या फेरीपर्यंत कायम होती. मात्र तोपर्यंत खोतकरांनी प्रत्येक फेरीत वाढीव मते घेत चव्हाण आणि रशीद यांना पिछाडीवर टाकल्याने या फेरीत गोरंट्याल व खोतकर यांच्यातच सामना रंगला. २१ व्या फेरीत गोरंट्याल यांना ४३ हजार २७३ तर खोतकर यांना ४२ हजार ४०५ मते होती. त्यामुळे आता अंतिम फेरीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. २२ व्या फेरीत टपाल मतांसह खोतकर ४५ हजार ७८ मते घेऊन विजयी झाले. गोरंट्याल यांना ४४ हजार ७८२, चव्हाण यांना ३७ हजार ५९१ तर अब्दूल रशीद यांना ३६ हजार ३५० मते मिळाली. मनसेचे रवि राऊत यांना ५ हजार ५००, राकाँचे खुशालसिंह ठाकूर यांना १ हजार ६११, अपक्ष संदीप खरात यांना १ हजार १७४, अॅड. ज्ञानेश्वर वाघ १ हजार ४८, ज्ञानेश्वर नाडे यांना १ हजार २३ मते मिळाली. अन्य उमेदवार तीन अंकी मतांपर्यंतच पोहोचले. विजयानंतर कार्यकर्त्यांनी खोतकर यांचे स्वागत केले. यावेळी भास्कर अंबेकर, अनिरुद्ध खोतकर, दिनेश फलके, विष्णू पाचफुले आदी उपस्थित होते.
काट्याच्या लढाईत अखेर खोतकर यांची सरशी
By admin | Updated: October 20, 2014 00:32 IST