प्रशांत तेलवाडकर , औरंगाबाद औरंगाबाद ते चाळीसगाव हा प्रवास केवळ एक तासात पूर्ण करता येईल, असे सांगितले तर त्यावर विश्वासच बसणार नाही. मात्र, नियोजित औरंगाबाद- धुळे राष्ट्रीय महामार्गात रेल्वेलाईनची भर पडली तर कन्नडला अर्ध्या तासात, चाळीसगावला एक तासात पोहोचता येईल. एवढेच नव्हे तर दक्षिण मध्य रेल्वे-मध्य रेल्वेशी जोडल्या गेल्याने मराठवाड्याच्या विकासात आणखी भरभराट होऊ शकते. राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाने (एनएचएआय) औरंगाबाद-धुळे राष्ट्रीय महामार्गाचे नियोजन केले आहे. यात मराठवाड्यातील लोकप्रतिनिधी व जनतेने दिल्ली दरबारात आवाज उठविला तर रेल्वेलाईनचा प्रस्तावही मंजूर होऊ शकतो. या कामात रेल्वेलाईनचेही जाळे निर्माण होऊ शकते. यासाठी अतिरिक्त भूसंपादनही करण्याची गरज भासणार नाही. सोलापूर-औरंगाबाद-धुळे या ४५३ किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. महामार्ग बनविण्यासाठी ७५०० कोटीही मंजूर करण्यात आले आहे. यात औरंगाबाद ते धुळे या महामार्गासाठी २ हजार कोटी व चाळीसगाव घाटातील बोगद्यासाठी १४०० कोटी रुपयांचा समावेश आहे.औरंगाबाद- धुळे हा १६० किलोमीटरचा महामार्ग तयार करण्यात येणार आहे. यासाठी जमीन संपादन करण्यात येणार आहे. या प्रकल्पातच राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी रेल्वेलाईनसाठीही जागा सोडता येऊ शकते, अशी मांडणी एनएचएआयने केली आहे. या प्रकल्पातच जर रेल्वेलाईनला केंद्र सरकारने मंजुरी दिली तर कायमस्वरूपी औरंगाबाद ते चाळीसगावपर्यंत रेल्वेलाईन जोडली जाऊ शकते. एनएचएआयचे नियोजन एनएचएआयच्या अधिकार्यांनी सांगितले की, औरंगाबाद- धुळे राष्ट्रीय महामार्गासाठी भूसंपादन करण्यात येणार आहे. रस्त्यासाठी २०० फूट रुंद जागा संपादित करण्यात येणार आहे. यात मधोमध ८० फुटांचा रस्ता तयार करण्यात येईल. दोन्ही बाजूंनी प्रत्येक ६० फूट जागा (१२० फूट) जागा शिल्लक राहते. यात दीड मीटरच्या रेल्वेलाईनला १२ फूट जागा लागते. रेल्वेच्या डब्याची रुंदी विचारात घेता रेल्वेला एका मार्गासाठी १५ फूट जागा सोडावी लागते. म्हणजे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना ३० फूट जागा रेल्वेसाठी दिली तरी ९० फुटांची जागा शिल्लक राहते. यामुळे रस्त्याची रुंदी आणखी वाढवता येऊ शकते. तसेच चाळीसगाव घाटात ७ किलोमीटरचा बोगदा तयार करण्यात येणार आहे. याकरिता येण्या-जाण्यासाठी दोन स्वतंत्र बोगदे तयार करण्यात येणार आहेत. प्रत्येक बोगद्याची रुंदी २४ मीटर राहील. रेल्वेलाईनचा प्रस्ताव मंजूर झाला तर प्रत्येक बोगद्यात आणखी १५ मीटरची अतिरिक्त जागा वाढविता येऊ शकते. यामुळे औरंगाबाद ते चाळीसगाव, धुळे थेट रेल्वेलाईनने जोडले जाईल. यामुळे येथील औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळू शकते. मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींनी जर केंद्र सरकारकडे औरंगाबाद- धुळे रेल्वेलाईनची मागणी केली व ती मंजूर झाली तर महामार्ग व रेल्वेलाईनचे कामही एकाच वेळी सुरू होऊ शकते. हजार कोटींचा अतिरिक्त खर्च औरंगाबाद- धुळे या राष्ट्रीय महामार्गासाठी भूसंपादन करण्यात येणार आहे. यामुळे रेल्वेलाईनसाठी कोणतेही अतिरिक्त भूसंपादन करण्याची गरज पडणार नाही. महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी रेल्वेलाईन टाकता येईल. दौलताबाद ते चाळीसगाव हे ७२ किलोमीटरचे अंतर आहे. यासाठी एका लाईनला ५०० कोटींचा खर्च म्हणजे येण्या व जाण्यासाठी दोन लाईनला १ हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. रस्ता व बोगद्यासाठी ३,४०० कोटींचा खर्च मंजूर करण्यात आला आहे. यात एक हजार कोटींचा खर्च वाढेल. मात्र, मराठवाड्यातून या रेल्वेलाईनसाठी केंद्र सरकारकडे मागणी झाली, तर राष्ट्रीय महामार्ग व रेल्वेलाईनच्या कामाला एकदाच सुरुवात करता येऊ शकते. यामुळे शासनाचा वेळ व पैशांचीही बचत होऊ शकते. हा प्रकल्प औरंगाबादच नव्हे तर मराठवाड्याच्या विकासात मैलाचा दगड ठरू शकतो. -जे.यू. चामरगोरे, प्रकल्प संचालक, एनएचएआय १९ वर्षांपूवी रेल्वेमंत्र्यांना पत्र औरंगाबाद ते चाळीसगाव हा रेल्वेमार्ग तयार करण्यात यावा या मागणीचे निवेदन १७ फेब्रुवारी १९९५ रोजी रेल्वेमंत्री जाफर शरीफ यांना दिले होते. त्याला शरीफ यांनी १२ आॅक्टोबर १९९५ रोजी पाठविलेल्या पत्रात म्हटले होते की, ‘दौलताबाद- कन्नडमार्गे चाळीसगाव, अशी ८० किलोमीटरची नवीन रेल्वेलाईन टाकण्यासाठी २०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सध्या रेल्वेमंत्रालयाकडे या प्रकल्पावर खर्च करण्यासाठी पुरेसा निधी नाही.’ मात्र, आता औरंगाबाद- धुळे या राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूने रेल्वेलाईन टाकता येते. हा एनएचएआयचा प्रस्ताव सर्वोत्तम आहे. यासाठी आमची समिती केंद्र सरकारकडे पाठपुरावा करील. -ओमप्रकाश वर्मा, अध्यक्ष, मराठवाडा रेल्वे विकास समिती सध्याचा रेल्वेमार्ग औरंगाबाद- मनमाडमार्गे चाळीसगाव कि. मी.- १६० कि.मी.चा मार्ग प्रवासाचा वेळ - ३ तास पॅसेंजरचे भाडे - ४० रुपये संकल्पित रेल्वेमार्ग झाल्यास दौलताबाद - कन्नडमार्गे चाळीसगाव कि. मी. - ७५ कि. मी. चा मार्ग प्रवासाचा वेळ - १ तास २० मिनिटे पॅसेंजरचे भाडे - १५ रुपये.
अवघ्या अर्ध्यातासात कन्नड
By admin | Updated: May 26, 2014 01:17 IST