कन्नड : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाची दुरवस्था झाली आहे. एकेकाळी हे उद्यान शहराच्या सुशोभीकरणात भर घालणारे होते; मात्र नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे आज हे उद्यान भकास झाले आहे. विविध दलित संघटनांनी नगर परिषदेस वारंवार निवेदने देऊन उद्यानाच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याचा परिणाम झालेला नाही. शहरातील प्रशस्त जागेवर हे उद्यान आहे. उद्यानात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा आहे. ६ डिसेंबर, १४ एप्रिल, बुद्धपौर्णिमा, विजयादशमी या दिवशी शहरातील दलित बांधव या ठिकाणी एकत्र जमून डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यास अभिवादन करतात व वंदना घेतात. नगर परिषदेने या उद्यानाचे सुशोभीकरण करावे व एका कर्मचार्याची देखभालीसाठी नियुक्ती करावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर) या उद्यानात सामाजिक सभागृह बांधण्यात आले होते. या सभागृहाच्या छतावरील पत्रे गायब आहेत. सभागृहाच्या खिडक्या चोरीस गेलेल्या आहेत. सभागृहातील फरशी काढून नेण्यात आली आहे. उद्यानाची संरक्षक भिंत ठिकठिकाणी पाडण्यात आली आहे. उद्यान सुशोभीकरणासाठी बसविण्यात आलेले हंडी बल्ब काढून नेण्यात आले असून, केवळ पाईप उभे आहेत. लहान मुलांसाठी बसविण्यात आलेल्या खेळणीचा फक्त सांगाडा शिल्लक आहे. उद्यानात असलेल्या बागेची जागा मोकळ्या मैदानाने घेतली आहे.
कन्नडचे उद्यान झाले भकास
By admin | Updated: May 27, 2014 01:22 IST