जालना : जिल्ह्यात अल्पशा पावसामुळे खरिपापाठोपाठ रबीच्या हंगामालाही तडाखा बसला असून दुष्काळाजन्य स्थितीमुळे नागरिक हैराण झालेले आहेत. अशा काळात प्रशासनाकडून बैठकांवर बैठकाच सुरू असून प्रत्यक्षात कामे काहीच सुरू नसल्याने ग्रामीण भागात भयावह चित्र पाहावयास मिळत आहे.जिल्ह्याची आणेवारी फक्त ३९ पैसे आहे. सर्वच तालुक्यांची आणेवारी ५० टक्क्यांपेक्षा कमी आहे. २०१२ मध्ये जिल्ह्याने राज्यात सर्वाधिक दुष्काळ अनुभवला होता. त्यापाठोपाठ आता २०१४ मध्येही दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. विलंबाने व अल्पशा आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे खरिपाच्या पेरणीचे नियोजन बिघडले होते. तेव्हा शंभर टक्के पेरण्या झाल्या असल्या तरी अल्पशा पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. त्याचा परिणाम म्हणून उत्पन्नात घट झाली. खरिपातील मुख्य पीक कापूस व सोयाबीनवर शेतकऱ्यांनी केलेला खर्चही अद्याप निघाला नाही. रबीच्या पेरण्या ५० टक्क्यांपेक्षाही कमी असून जिल्ह्यात यावर्षी १५ नोव्हेंबरपर्यंत ३७८.१७ मि.मी. म्हणजे वार्षिक सरासरीच्या ५४ टक्के पाऊस झाला. २०१२ व २०१४ या दोन्ही वर्षात शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. २०१३ हे वर्ष समाधानकारक पावसामुळे बऱ्यापैकी गेले असले तरी त्यातून आलेल्या उत्पन्नावर यावर्षी पुन्हा पाणी फेरले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची गरज आहे.आगामी काळात पाणीटंचाई, चाराटंचाईचा सामना शेतकऱ्यांना करावा लागणार आहे. त्यावेळी काय नियोजन करावयाचे, हे प्रशासनाकडून बैठकांच्या माध्यमातून ठरविले जात आहे. परंतु सद्यस्थितीत काहीच उपाययोजना होत नसल्याचा शेतकऱ्यांमधून सूर आहे. ग्रामीण भागात महावितरणकडून १२ तासांपेक्षा अधिक वेळेचे वीज भारनियमन सुरू आहे. अनेक गावांमध्ये रोहित्रे नादुरूस्त असल्याने शेतीला पाणी देण्यासाठी वीज नाही. रोहित्रांची मागणी केल्यानंतर विविध ठिकाणी महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ केली जाते. अशा वेगवेगळ्या समस्यांना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने याही बाबीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)४दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाकडून उपाययोजना सुरू असल्याचे सांगितले जाते. मात्र प्रत्यक्षात कागदोपत्राशिवाय काहीच होत नाही. तालुका, जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यरत अधिकाऱ्यांनी आतापासून प्रत्यक्षात ग्रामीण भागाचे दौरे केल्यास त्यांना खरी परिस्थिती लक्षात येईल, अशी प्रतिक्रिया काही जाणकार शेतकऱ्यांनी व्यक्त केली.४जिल्ह्यातील आठ तालुक्यांपैकी सर्वाधिक आणेवारी ४६ पैसे जाफराबाद तालुक्याची तर सर्वात कमी बदनापूर तालुक्याची ३४ आहे. त्या पाठोपाठ मंठा- ३८.१८, भोकरदन- ४०, घनसावंगी ४२.४८, जालना ४०.२५, अंबड ३८, परतूर ३६ पैसे अशी एकूण जिल्ह्याची आणेवारी ३९ पैसे आली आहे.
दुष्काळाबाबत केवळ बैठकावर बैठकाच..!
By admin | Updated: November 20, 2014 00:47 IST