संजय तिपाले , बीडजिल्हा परिषदेकडून दिले जाणारे शिक्षक पुरस्कार यंदा आचारसंहितेच्या कात्रीत सापडण्याची शक्यता आहे़ पुरस्कारासाठी ७५ प्रस्ताव प्राप्तही झाले आहेत;पण ५ सप्टेंबरपर्यंत आचारसंहिता लागू झाली तर वितरणाचा मुहूर्त पुढे ढकलावा लागेल़ दोन वर्षांपूर्वी देखील पुरस्कार वितरण झाले नव्हते़ तेंव्हा मुदतीत आयुक्तांची परवानगी मिळू शकली नव्हती़५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो़ शिक्षक दिनानिमित्त आदर्श गुरुजींच्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी, यासाठी जिल्हा परिषदेने पुरस्काराची पंरपरा जपली आहे़ प्रत्येक तालुक्यातून एक माध्यमिक व प्राथमिक शिक्षक पुरस्कारासाठी निवडले जातात़ शिवाय चित्रकला, क्रीडा या विषयातील शिक्षकांसाठी जिल्ह्यातून एक विशेष पुरस्कार दिला जातो़ २०१२-१३ मध्ये आयुक्तांची परवानगी घेण्यास विलंब झाल्याने पुरस्कार वितरण होऊ शकले नाही़ त्यामुळे २०१३- १४ या वर्षीच्या पुरस्कारांसोबत मागील वर्षीच्या पुरस्कारांचे वितरण केले होते़ यावर्षी शिक्षण विभागाने जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी गटशिक्षण अधिकाऱ्यांकडून प्रस्ताव मागविले आहेत;परंतु विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली तर पुरस्कार वितरण करता येणार नाही़ त्यामुळे दोन वर्षांपूर्वीप्रमाणेच यंदाही गुरुजी सन्मानाला मुकतील, अशी चिन्हे आहेत़दरम्यान, वडवणी तालुक्यात जिल्हा परिषदेची एकही माध्यमिक शाळा नाही़ पाटोदा व केज येथील गटशिक्षणाधिकाऱ्यांनी तालुक्यात एकही शिक्षक पुरस्कारासाठी पात्र नाही, असा अहवाल दिला आहे़ प्राप्त ७५ प्रस्तावांमधून १९ जणांची पुरस्कारासाठी निवड होणार आहे़अशी आहे निवड प्रक्रियाजिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी निवड समिती नेमली जाते़ जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखालील समितीत सीईओ, शिक्षण सभापती, समाजकल्याण सभापती, शिक्षणाधिकारी (प्रा़), शिक्षणाधिकारी (मा़) यांचा समावेश असतो़ समितीने नावे अंतिम केल्यावर पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून शिक्षकांचे चारित्र्य प्रमाणपत्र घेतले जाते़ त्यानंतर विभागीय आयुक्तांकडून अंतिम मंजुरी घ्यावी लागते़जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी सेवा, चारित्र्य, गुणवत्ता या अटी आहेत़ शिक्षकांची किमान १५ तर मुख्याध्यापकाची २० वर्षे सेवा झालेली हवी़ निवड झालेल्या शिक्षकांना सन्मानपूर्वक गौरविले जाते़ शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह व रोख ५०० रुपये असे पुरस्काराचे स्वरुप आहे़शिक्षणाधिकारी (प्रा़) एस़ वाय़ गायकवाड म्हणाले, पुरस्कारासाठी शिक्षक निवडीची प्रक्रिया सुरु केली आहे़ ४गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून प्रस्ताव आले आहेत़ त्याची संचिका येत्या दोन दिवसांत समितीपुढे ठेवण्यात येईल़ त्यानंतर नावे जाहीर करण्यात येतील़४आचारसंहिता लागू झाली तर वितरण पुढे ढकलावे लागेल, असे त्यांनी सांगितले़
जि़प़चे शिक्षक पुरस्कार पुन्हा कात्रीत !
By admin | Updated: August 25, 2014 23:54 IST