संजय तिपाले, बीड‘माहेराची माया कुणाला गावना़़़ माहेराचं सुख पदरात मावना़़़ आई- बाबा- दादा- वहिनी सारी आबादानी़़़ अंगणात रंगली गं माहेराची गाणी’ ‘पाहुणी’ या चित्रपटातील जगदीश खेबूडकर यांचं हे गीत़ धावत्या युगात माहेरच्या भावना आजही या गीताप्रमाणेच आहेत;पण ‘बिझी शेड्यूल’मुळे अनेक सासुरवाशिणींना सासरीच माहेरपण शोधावे लागतेय़ नागपंचमीच्या झोक्याचीही अशीच घुसमट़ झाडावरचा झोका गॅलरीत काधी पोहोचला ते कळलेच नाही.श्रावणात येणाऱ्या नागपंचमी सणाचे महिलांमध्ये मोठे महत्त्व आहे. नागपंचमीच्या एक दिवस आधी महिला भावासाठी उपवास करतात, अशी परंपरा आहे. नागपंचमीला माहेरी आलेल्या लेकी एकत्र येऊन झोका, टिपऱ्या खेळत. वारुळाची पूजा करुन घरोघर गोडधोड पदार्थांची रेलचेल असे. ग्रामीण भागात आजही ही प्रथा कायम आहे;पण शहरात मात्र नागपंचमी केवळ नावालाच उरली असल्याचे दिसत आहे. सिमेंंटच्या जंगलात झाडांची संख्या झपाट्याने कमी झाली. परिणामी झोके बांधण्यासाठी झाडेच शिल्लक राहिली नाहीत. त्यामुळे घरातील गॅलरीत छोटासा झोका बांधून केवळ परंपरा जपली जात आहे. गॅलरीत अपूरी जागा असते. तेथे ‘उंच माझा झोका गं’ असं म्हणण्याचीही सोय नसते;परंतु वृक्षांअभावी पर्यायही उरलेले नाहीत. शहरात राहणाऱ्या बहुतांश महिला नोकरी, जॉबमध्ये व्यस्त आहेत. बिझी शेड्यूलमध्ये त्यांना नागपंचमीला माहेरी जाण्यासाठी वेळच मिळत नाही, अशी स्थिती आहे. काही सासुरवाशिणी मुलांच्या शिक्षणामुळे माहेरी जाण्याचे टाळत असल्याचे पहावयास मिळत आहे. याचा अर्थ माहेरची ओढ कमी झाली असे मुळीच नाही;पण माहेर पारखे झाल्याने सुख, दु:खाच्या चार गोष्टी माहेरकडील लोकांजवळ ‘शेअर’ करण्याची संधीही सासुरवाशीणींना मिळत नाही. सुखाच्या शोधात भावनांच्या झुल्यावर त्यांची नित्याचीच कसरत होते.आता फरक उरलाच नाहीसासर अन् माहेर यात आता फारसा फरक उरला नाही. त्यामुळे नागपंचमीच्या सणाला माहेरीच गेले पाहिजे, असे काही नाही. माहेरची ओढ कोण्या सासुरवाशीणीला नाही;पण इच्छा असूनही माहेरी जाता येत नाही. झोके विरळ झाले आहेत हे मात्र खरेच आहे. आता झोक्यांचे आकर्षण अन् उत्सुकताही कमी झाली आहे.- राजश्री थोरात, बीडमाहेराची सर सासरला कशी येईल?सणासुदीला माहेरी जाण्याची आपल्याकडील पंरपरा छानच आहे. कारण सासुरवासीणींना माहेरी जाण्याची संधी यामुळे मिळते. माहेरी सासरपेक्षा जास्त प्रेम लाड असतात. संसार तर रोजचाच आहे; पण पंचमीमुळे चार दिवस माहेरात रहायला मिळते अन् मैत्रिणींसोबत झोेकाही खेळायला मिळतो.- वर्षा जोेगदंड, बीड
झोका झाडावरुन गॅलरीत...!
By admin | Updated: August 1, 2014 01:05 IST