लातूर : देश पातळीवरील यशवंत पंचायत पुरस्कार मिळालेल्या लातूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यालयाच्या परिसरात उभारण्यात आलेल्या संत गाडगेबाबा स्वच्छता उद्यानाची दुरावस्था झाल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये शनिवारी छापून येताच जि़प़ प्रशासन खडबडून जागे झाले आणि स्वच्छतेच्या कामाला लागले. लातूर जिल्हा परिषद प्रशासनाने देशपातळीवर प्रथम क्रमांकाचा यशवंत पंचायत पुरस्कार मिळवून देशात नाव लौकिक केले़ तसेच संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात जिल्ह्यातील असंख्य गावांना ग्रामस्वच्छता अभियानाचे पुरस्कारही प्राप्त झाले़ तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण गेडाम यांनी जिल्ह्यात संत गाडगेबाबा अभियान गतीमान करण्यासाठी जिल्हा परिषद परिसरात २००६-०७ साली संत गाडगेबाबा स्वच्छता उद्यानाची निर्मिती केली़ या उद्यानामध्ये स्वच्छतेचे व शौचालयाचे महत्त्व नागरिकाला पटवून देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या शौचालयाची प्रतीकृती मध्ये लहान बालकांसाठीचे शौचालय, अंगणवाडीतील शौचालय, एक खड्डा शौचालय, सेफ्टी टँक शौचालय अशा विविध प्रकारच्या १९ शौचालये बनविण्यात आले होते़ लातूर जिल्ह्यातील नागरिक जेव्हा कामानिमित्त जिल्हा परिषद परिसरात येतील, तेव्हा त्यांनी या उद्यानातील प्रतिकृती पाहून आपल्याही घरी शौचालय बांधावे या उद्देशासाठी उद्यानाची निर्मिती करण्यात आली होती़ जिल्ह्यातील लोकांना शौचालयाचे व संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचे महत्व कळावे हा त्यामागील मुख्य हेतू होता़ या ७ वर्षाच्या कालावधीत जिल्ह्यात स्वच्छता अभियान प्रभावीपणे राबविण्यात आले़ हे जरी सत्य असले तरी जिल्हा परिषद परिसरात असणारे संत गाडगेबाबा स्वच्छता उद्यान हे आजघडीला मोडखळील आले असून त्याची दुरावस्था झाली आहे़ हे वृत्त छापताच जिल्हा परिषद प्रशासन जागे झाले आहे़ मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी स्वच्छतेचे आदेश दिले असून जि़प़ परिसरासह सर्व शासकीय कार्यालयांची स्वच्छता मोहिम उघडण्यात आली आहे़ याअंतर्गत शनिवारी सुट्टी असतानाही कर्मचाऱ्यांनी शासकीय कार्यालयाची साफसफाई केली. तसेच जिल्हा परिषद परिसर व संत गाडगेबाबा उद्यान परिसरातही स्वच्छता मोहिम राबविली आहे़ या स्वच्छतेअंतर्गत टेबल क्लॉथपासून अधिकाऱ्यांचे कक्षही चकाचक केले़ (प्रतिनिधी)
जि़प़प्रशासन खडबडून जागे;स्वच्छता सुरू
By admin | Updated: September 13, 2014 23:48 IST