जालना : शहरातील दवाबाजार भागात सलग तीन दुकाने फोडून चोरट्यांनी १ लाख १० हजारांची रक्कम लांबविली. विशेष म्हणजे यापैकी दोन दुकानांमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज टिपले जाऊ नयेत, म्हणून कॅमेरे फोडून त्याचे डीव्हीआरही चोरून नेले. ही घटना मंगळवारी मध्यरात्रीनंतर घडली.दवा बाजार भागात पहिल्या मजल्यावर प्रमोद धनराज तोतला यांचे समर्थ एजन्सी, सत्यनारायण चेचाणी यांचे पीएम फार्मा, अरुण भक्कड यांचे माऊली एजन्सी हे दुकान सलग आहे. मंगळवारी रात्री चोरट्यांनी एकापाठोपाठ या तिन्ही दुकानांचे शटर वाकवून आत प्रवेश केला. सीसीटीव्ही कॅमेरे फोडले. गल्ल्यातील रोकड घेऊन चोरटे तेथून पसार झाले. हा प्रकार लक्षात येताच सकाळी उपविभागीय पोलिस अधिकारी दीक्षितकुमार गेडाम, सदर बाजार ठाण्याचे पोलिस निरीक्षक चेतन बल्लाळ, उपनिरीक्षक बुंदेले, श्रीमंतराव ठोंबरे, पोकाँ रणजित वैराळ व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले.पंचनामा करून श्वानपथक व हस्तरेषा तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. श्वान पक्कीने देऊळगावराजा रोडकडे जाणाऱ्या रस्त्यापर्यंत माग काढला. (प्रतिनिधी)
जालन्यात तीन दुकाने फोडली
By admin | Updated: January 22, 2015 00:42 IST