गजेंद्र देशमुख , जालनायेथील बसस्थानकाची सुविधांअभावी बकाल अवस्था झाली आहे. रस्त्याचे रखडलेले काम, धूळ आणि सर्वत्र पसरलेल्या अस्वच्छतेमुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. विशेष म्हणजे या प्रकाराकडे एसटी महामंडळाचेही दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.जिल्हा ठिकाणाचे बसस्थानक असल्याने येथील बसस्थानक स्वच्छ आणि सुंदर असेल असा बाहेरुन येणाऱ्या प्रवाशांचा समज असतो. मात्र बसस्थानकात सर्वच गोष्टी आलबेल आहेत. प्रवेशद्वारापासूनच समस्या सुरु होतात. प्रवशेद्वारातील अनेक प्लेव्हर ब्लॉक निघून गेले आहेत. यामुळे मोठा अपघात होण्याची भीती आहे. दुचाकी तसेच पादचारी पाय अडकून पडत आहेत. बसस्थानकाचा दर्शनी भागही स्वच्छ नाही. डाव्या तसेच उजव्या बाजूला कचऱ्याचे ढिगारे तसेच अस्ताव्यस्त लागलेल्या दिसून येतात. फलाट सोडता नियमित साफसफाई कोठे होते की नाही असा प्रश्न प्रवशांना पडतो. स्वच्छतागृहात दुर्गंधी आहे. पाणी पाऊच व इतर कचरा सर्वत्र असल्याने प्रवाशाही वैतागले आहेत. अनेक वेळा येथे पाणीही मिळत नसल्याच्या तक्रारी प्रवाशांमधून होतांना दिसून येतात.
जालना बसस्थानकाला आले बकाल स्वरूप
By admin | Updated: March 18, 2015 00:17 IST