अंबड : वाळू तस्करांनी महसूल व पोलीस प्रशासनाच्या कारवाईपासून वाचण्यासाठी नवीन शक्कल लढविली आहे. नेहमीच्या वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांचा वापर न करता किराणा, भुसार मालाची वाहतूक करणाऱ्या बंद ट्रकचा वापर वाळू तस्करीसाठी सुरु करण्यात आला आहे.महसूल पथकाने नुकत्याच केलेल्या एका कारवाई दरम्यान वाळू ास्करांची ही शक्कल समोर आली. तस्करांच्या या चलाखीने वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रक, आयशर आदी वाहनांबरोबरच भुसार मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांवरही लक्ष ठेवण्याचे मोठे आवाहन महसूल व पोलीस यंत्रणेसमोर उभे ठाकले आहे. अंबड तालुका वाळु तस्करांसाठी नंदनवन मानला जातो. तालुक्यास मोठा गोदाकाठ लाभला आहे. अंबड व घनसावंगी अशा दोन्ही तालुक्यातील वाळूची तस्करी औरंगाबाद, जालना व इतरत्र करण्यासाठी तस्करांना अंबड तालुक्यातील रस्त्यांशिवाय पर्याय नाही. पुर्वी केवळ बाहेरच्या जिल्हयातील किंवा तालुक्यातील वाळू माफिया वाळूची तस्करी करायचे. आता मात्र त्यांचा आदर्श घेत भूमिपुत्रांनीही या काळ्याधंद्यात उडी घेऊन मोठी मजल मारली. बेफाम वाळू उपशाचे दुष्परिणाम भोगावे लागत आहेत.पर्यावरणाचा गंभीर प्रश्न, खराब रस्ते आदी समस्यांबरोबरच खालावत चाललेल्या पाणी पातळीच्या गंभीर संकटास सामान्य जनतेला सामोरे जावे लागत आहे. शासनाने तालुक्यातील सर्व वाळू पट्टयांचा वाळू उपसा थांबविण्याचा निर्णय घेतला, मात्र वाळू माफियांनी या निर्णयास झुगारुन लावत आपला अवैध वाळू उपसा व तस्करी कायम ठेवली.वाळू तस्करांशी अनेकदा सामना झाल्यानंतर व त्यांच्यावर अनेकदा कारवाई केल्याने महसूल व पोलीस प्रशासनातील बहुतांश अधिकारी व कर्मचाऱ्यांना वाळू तस्करांच्या कार्यपध्दतीविषयी चांगली माहिती झाली आहे.वाळू माफियांनीही या गोष्टीचा विचार करत आपल्या कार्यशैलीत बदल करत वाळु तस्करीचा नवीन फंडा शोधून काढला आहे. वाळू तस्करांनी पोलीस व महसूल विभागास चकवा देण्यासाठी आता वाळू तस्करी नेहमीच्या माल वाहतूक वाहनांमधून न करता भुसार माल वाहतूक करणाऱ्या वाहनांमधून करण्यास सुरुवात केली आहे.२२ आॅगस्ट रोजी उपविभागीय अधिकारी श्रीमंत हारकर व तहसीलदार महेश सावंत यांच्या पथकाने केलेल्या कारवाईत तब्बल दहा वाहने ताब्यात घेण्यात आली. यापैकी बहुतांश वाहने भुसार मालाची वाहतूक करणारी आहेत. विशेष म्हणजे बॉडी बंद असलेल्या या वाहनांमध्ये वाळू भरल्यानंतर ताडपत्रीने सगळीकडून वाहन झाकण्यात येते. त्यामुळे अशा वाहनांमधून वाळू तस्करी होत असेल अशा सशंय येऊ नये यासाठी सर्व तयारी करण्यात येते. नेहमीच्या वाळू वाहतुकीच्या वाहनांबरोबरच अशा भुसार मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवण्याचे आव्हान यंत्रणेसमोर उभे ठाकले आहे. (वार्ताहर)वाळू तस्कर गोंदी, कुरण, शहागड, तीर्थपुरी, साष्ट पिंपळगांव आदी भागात मोठया प्रमाणावर वाळू उपसा करतात व ही वाळू अंबड-जालना, अंबड-मार्डी-रोहिलागड मार्गे औरंगाबाद, अंबड-मार्डी-जामखेड-मार्गे औरंगाबाद, सुखापुरी फाटा-सोनकपिंपळगांव-वडीलासुरा-पाचोड मार्गे औरंगाबाद अशा विविध मार्गे तालुक्यातील वाळू तस्करी चालते.४उपविभागीय अधिकारी हारकर यांनी कारवाई केल्यानंतरही वाळू तस्करी सुरुच आहे. रात्री ३ ते सकाळी ८ वाजेच्या दरम्यान अंबड शहरातून भुसार मालाची वाहतूक करणारी वाहने वाळू तस्करी करत असल्याचे आढळून येते. या वाहनांपैकी अनेक वाहनांमधून पाणी गळताना स्पष्टपणे पाहावयास मिळते.
अंबड तालुक्यातून अवैध वाळू वाहतूक सुरुच
By admin | Updated: September 1, 2014 01:06 IST