पुर्णा :तालुक्यातील कळगाव येथील शेतकऱ्याची सावकाराने हडप केलेल्या जमिनीचे खरेदीखत रद्द करुन ही जमीन मूळ मालकाला परत करण्याचे निर्देश जिल्हा उपनिबंधकांनी दिले आहेत.या प्रकरणाची माहिती अशी की, कळगाव येथील शेतकरी भागोराव महाजन सुरवसे यांनी गट क्रमांक ३५३ मधील एक एकर जमीन सावकार नंदाबाई नारायण सुरवसे यांच्या नावे करुन त्या बदल्यात अडीच लाख रुपये घेतले होते. या व्यवहारात तीन वर्षानंतर सदरील जमीन बाजारभावाप्रमाणे परत देण्याचा करार झाला होता. तीन वर्षानंतर या जमिनीचा मोबदला दिल्यानंतरही ही जमीन परत दिली जात नसल्याने भागोराव सुरवसे यांनी यासंदर्भात महाराष्ट्र सावकारी अधिनियमानुसार २५ मे रोजी पूर्णा येथील तालुका उपनिबंधकाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रार अर्जाबाबत १ आॅगस्ट २०१५ रोजी सहकार अधिकारी एस. बी.कुलकर्णी यांनी चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणात चार वेळा सुनावणी झाली. तीन साक्षीदारांचे म्हणणेही ऐकण्यात आले. या सर्व सुनावणीअंती जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी १६ मार्च रोजी एक आदेश पारित केला आहे. त्यानुसार नंदाबाई नारायण सुरवसे यांनी गट नं.३५३ मधील जमिनीचे करुन दिलेले खरेदीखत सावकारी अधिनियमानुसार अवैध घोषित करण्यात आले आहे. खरेदीखतामधील जमीन मूळ मालक भागोराव सुरवसे यांना परत करण्याचे आदेश दिले आहेत.परभणी जिल्ह्यातील पहिलेच प्रकरणजिल्हाभरात अवैध सावकारीचे प्रमाण मोठे आहे. त्याविरुद्ध तक्रारीही दाखल होतात. परंतु, न्याय मिळण्याचे प्रमाण नगण्य स्वरुपात आहे. कळगाव येथील शेतकऱ्याने अवैध सावकारीविरुद्ध दाखल केलेल्या तक्रारीनंतर शेतकऱ्याच्या बाजूने निकाल लागला आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील हे एकमेव प्रकरण ठरत असून सावकाराकडून गंडविलेल्या अनेकांना या प्रकरणातून आशेचा किरण दिसत आहे.
सावकाराने लाटलेली जमीन परत करण्याचे निर्देश
By admin | Updated: March 19, 2016 20:23 IST