लातूर : जिल्ह्यातील नागरिकांना पिण्यायोग्य स्वच्छ पाणी मिळावे या दृष्टीकोनातून पाणी पुरवठा विभागाच्या वतीने पाण्याचे स्त्रोत तपासण्यात येत आहे़ जिल्ह्यातील ७८७ ग्रामपंचायती अंतर्गत असलेले सर्व स्त्रोत तपासले जाणार आहेत़ पाण्यात कोणत्या क्षारघटकांची कमतरता आहे ते तपासले जाणार आहे़ यासाठी जलसुरक्षा रक्षक कामाला लागले आहेत़ लातूर जिल्ह्यातील जिल्हा पाणी स्वच्छता मिशन अभियानांतर्गत नागरिकांना स्वच्छ पाणी मिळावे यासाठी जिल्हाभरातील सर्वस्त्रोतांची ५ प्रयोगशाळा अंतर्गत तपासणी करण्याची मोहिम सुरु करण्यात आली आहे़ यामध्ये रेणापूर तालुक्यातील ६६ ग्रामपंचायती अंतर्गत ७३९ पाण्याचे स्त्रोत आहेत़ लातूर तालुक्यातील १०९ ग्रामपंचायती अंतर्गत ६०२ पाण्याचे स्त्रोत आहेत़शिरुर अनंतपाळ तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतीअंतर्गत ३६० पाण्याचे स्त्रोत आहेत़ देवणी तालुक्यातील ४६ ग्रामपंचायती अंतर्गत २५९ स्त्रोत, उदगीर तालुक्यातील ८७ ग्रामपंचायतीअंतर्गत ६५३ स्त्रोत जळकोट तालुक्यातील ४३ ग्रामपंचायत अंतर्गत २७० स्त्रोत अहमदपूर तालुक्यातील ९७ ग्रामपंचायत अंतर्गत ६८० स्त्रोत, चाकूर तालुक्यातील ७२ ग्रामपंचायती अंतर्गत ६०८ स्त्रोत, औसा तालुक्यातील १०८ ग्रामपंचायती अंतर्गत ७३० स्त्रोत, निलंगा तालुक्यातील ११६ ग्रामपंचायती अंतर्गत ७६२ स्त्रोत असा एकूण ७८७ ग्रामपंचायती अंतर्गत असलेल्या ५६६३ जलस्त्रोतांची तपासणी करुन नागरीकांना स्वच्छ पाणी पुरवठा करण्याचे नियोजन पाणी पुरवठा विभागाच्या वतीने करण्यात येत आहे़ यासाठी ग्रामस्थरावर प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एका जलसुरक्षा रक्षकाची नेमणूक करण्यात आली असून पाणी तपासणी केल्यानंतरच नागरिकांना आपापल्या गावातील पाणी पिण्यायोग्य आहे की नाही हे लक्षात येणार आहे़ यामध्ये जिल्हाभरातील कुठल्याही पाण्याच्या स्त्रोतामध्ये १़५ टक्के फ्लोराईड आढळल्यास ते पाणी पिण्यायोग्य नसल्याने तो स्त्रोत बंद करण्याचा आदेश संबंधीत ग्रामपंचायतीला देण्यात येणार आहे़ दरम्यान पाण्याची तपासणी करण्यासाठी पुर्वी पाणी नमुने नांदेड, पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवावे लागत होते़ परंतु, आता लातूर शहरात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे पाणी नमुने तपासणीची प्रयोगशाळा आहे़ शिवाय, नव्याने पाच प्रयोगशाळा लातूर जिल्ह्यात झाल्या आहेत़ त्यामुळे पाण्याचे स्त्रोत शुद्ध व्हावेत, यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभाग, आरोग्य विभाग पाणी नमुने तपासणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागागाच्या वतीने देण्यात आली़ पावसाळ्यात जलजन्य आजार होतात़ केवळ अशुद्ध पाण्यामुळे हे आजार उद्भवतात यावर आळा बसणार आहे़ लातूर जिल्ह्यात मुख्य प्रयोगशाळा लातूरात राहणार आहे़ या प्रयोगशाळेअंतर्गत रेणापूर, लातूर आणि शिरुर अनंतपाळ तालुक्यातील पाण्याची तपासणी करण्यात येणार आहे़ तर उदगीर येथील उपविभागीय प्रयोगशाळेअंतर्गत उदगीर, देवणी, जळकोट, अहमदपूर प्रयोगशाळेअंतर्गत अहमदपूर व चाकूर, किल्लारी प्रयोगशाळेअंतर्गत औसा व किल्लारी, निलंगा प्रयोगशाळेअंतर्गत निलंगा तालुक्यातील पाण्याच्या स्त्रोतांची तपासणी होणार आहे़ अशा एकूण ५ प्रयोगशाळेअंतर्गत पाणी तपासणी करुन कोणते स्त्रोत पिण्यायोग्य पाण्याचे आहेत़ हे नागरीकांना कळणार असल्याची माहिती जिल्हा पाणी स्वच्छता मिशन अभियानचे जिल्हा पाणी गुणवत्ता निरीक्षक प्रमोद हुडगे यांनी लोकमतशी बोलताना दिली़
जिल्ह्यातील दूषित पाण्याची तपासणी
By admin | Updated: September 13, 2014 23:47 IST