वाळूज महानगर : वाळूजला निविदा न काढता करण्यात आलेल्या विकासकामांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य शिवप्रसाद अग्रवाल यांनी जिल्हा परिषदेकडे केली आहे.जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात अग्रवाल यांनी म्हटले आहे की, वाळूज ग्रामपंचायतीच्या सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांनी कोणत्याही शासकीय कामासाठी निविदा न काढता बेकायदेशीररीत्या बीआरजीएफ (मागास क्षेत्र विकास निधी) योजनेंतर्गत विविध विकासकामे उरकली आहेत. निकृष्ट कामाचे मूल्यांकन न करता परस्पर बिले देण्यात आली आहेत. ड्रेनेजलाईन, सिमेंट रस्ता कामांसाठी शासकीय तरतुदीनुसार ५० हजार रुपयांहून जास्त खर्चाची कामे निविदा न काढता परस्पर उरकण्यात आली आहेत. निविदा न काढता परस्पर अंदाजपत्रकाला मान्यता देणाऱ्या अभियंत्यावरही कारवाई करावी, असे निवेदनात म्हटले आहे. ...म्हणून निविदा नाहीत याविषयी सरपंच रंजना भोंड यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, ड्रेनेजलाईन व सिमेंट रस्त्याचे काम ग्रामपंचायतीमार्फत केले जात असल्यामुळे निविदा काढण्यात आल्या नाहीत. मासिक सभेतील ठरावाकडे दुर्लक्ष गावात २००९ ते २०१३ पर्यंत विविध विकासकामे ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आली आहेत. बीआरजीएफ येथील वॉर्ड क्र. ५ मधील ड्रेनेजलाईनचे काम रखडले असून, जे काम झाले तेही निकृष्ट दर्जाचे होत असल्यामुळे संबंधितांना कामाचे बिल दिले जाऊ नये, असा ठराव मासिक सभेत संमत करण्यात आला होता. तरीही सरपंच व ग्रामसेवकाने सदस्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले.
विनानिविदा केलेल्या कामांची चौकशी करा
By admin | Updated: August 1, 2014 01:07 IST