येलदरी : शेतकऱ्यांनी जून-जुलैमध्ये सोयाबीनची पेरणी केली होती़ परंतु, त्यानंतर आॅगस्ट व सप्टेंबरमध्ये पडलेल्या पावसामुळे सोयाबीन पिकातील पाण्याचा निचरा न झाल्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे़ त्यातच आता अळीनेही डोके वर काढल्याने शेतकरी चांगलाच हवालदिल झाला आहे़ येलदरी, सावंगी म्हाळसा, मुरूमखेडा या भागातील शेतकऱ्यांनी जून, जुलैमध्ये अल्पश: पावसावर खरिपाची पेरणी केली होती़ जिल्ह्यात कधी नव्हे, एवढे पीक येलदरी, सावंगी म्हाळसा या परिसरात जोमात आले होते़ आॅगस्ट या महिन्यात पावसाने दांडी मारल्याने शेतकऱ्यांनी पाणी देऊन सोयाबीनचे पीक जगविण्याचा प्रयत्न केला़ यामुळे सोयाबीन पीक जोमात आले होते़ परंतु, २४ आॅगस्ट रोजी या परिसरात १२३ मिमी एवढा पाऊस पडला़ त्यामुळे या परिसरातील शेतामध्ये पाणीच पाणी झाले़ पावसाच्या पाण्याचा शेतातून निचरा होत नसल्याने सोयाबीनचे पीक जागेवरच जळून गेले़ त्याचबरोबर सोयाबीन पिकावर खोडा अळी, ऊंट अळी, चक्रीभुंगा आदी अळ्यांचा प्रादुर्भाव झाल्याने झाडाला शेंगाच राहिल्या नाहीत़ काही झाडांना १० ते १५ एवढ्याच शेंगा लागल्या आहेत़ त्यामुळे सोयाबीनच्या उताऱ्यामध्ये लक्षणीय घट होणार आहे़ केलेला खर्च निघतो की नाही, असा प्रश्नही शेतकऱ्यांना पडला आहे़त्यामुळे शेतकऱ्यांना पीक नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी या परिसरातील शेतकरी वर्गातून होत आहे़ (वार्ताहर)
सोयाबीनवर रोगाचा प्रादुर्भाव
By admin | Updated: September 14, 2014 23:38 IST