नामदेव बिचेवार, बारड ग्रामीण भागातील बालसंशोधकाने कुशाग्र बुद्धी व कल्पकतेच्या बळावर टाकाऊ पदार्थापासून हायड्रॉलीक जेसीबी मशीन तयार केले आहे़ ११ वर्षीय इंद्रजितने तयार केलेले यंत्र पाहण्यासाठी गर्दी होत आहे़मुदखेड तालुक्यातील बारडपासून सहा किमी अंतरावर डोंगरगाव हे गाव आहे़ जेमतेम हजार लोकसंख्या असलेल्या गावात प्राथमिक शिक्षणाची सुविधा आहे़ येथील इंद्रजित कैलास व्यवहारे हा नांदेड येथील के़ एम़ पाटील विद्यालयात सहाव्या वर्गात शिकत आहे़ बालपणापासून त्यास विविध वस्तू तयार करण्याचा छंद आहे़ उन्हाळी सुट्यात तो गावाकडे आला होता़ गावात रस्त्याचे काम जेसीबी मशीनद्वारे करण्यात येत होते़ तब्बल महिनाभर हे काम चालले़ जेसीबी मशीन कसे करते? असा प्रश्न बालसंशोधक इंद्रजितच्या मनात निर्माण झाला़ यातून संशोधनाला चालना मिळाली़ जेसीबीच्या विविध भागाचे अवलोकन केल्यावर ते हायड्रोलीक पॉवरवर चालत असल्याचे त्याच्या निदर्शनास आले़ हे यंत्र घरबसल्या बनवण्याचा आराखडा तयार करुन त्याने प्रत्यक्ष साहित्य जुळवण्यास सुरुवात केली़ एअर प्रेशर देण्यासाठी जनावरांसाठी वापरण्यात येणारे इंजेक्शनचे सिरींज, स्लाईनच्या नळ्यात पाणी भरुन इंजेक्शनद्वारे हवेचा दाब निर्माण करण्याची संकल्पना त्याने प्रत्यक्ष अंमलात आणली़ जोडणीसाठी प्लायवूडची पाटी तसेच वजन उचलण्यासाठी तार व खिळे वापरुन नांगर तयार केला़ अतिशय कल्पकतेने त्यावर रंगीत पेपरचे आच्छादन केले़ हे यंंत्र पुढे नेण्यासाठी व मागे आणण्यासाठी विविध १६ सिरींजची जुळवणी इंद्रजितने केली़ सदरील जेसीबी लहान स्वरुपाचे ओझे एका जागेवरुन दुसऱ्या जागी हलविण्याचे यशस्वी प्रात्यक्षिक त्याने ग्रामस्थांना करुन दाखविले़ घरात कुठलीही शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना ११ वर्षीय इंद्रजितची कल्पकता पाहून गावातील नागरिक अवाक् झाले़ याची चर्चा परिसरातील गावातही झाली़ एका शेतकऱ्याच्या मुलाने जोपासलेल्या संशोधकवृत्तीला योग्य चालना मिळाल्यास भावी वैज्ञानिक घडल्याशिवाय राहणार नाही़ जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सदर मॉडेल ठेवून आणखी काही इलेक्ट्रॉनिक वस्तू तयार करण्याचा मानस इंद्रजितने व्यक्त केला़ जेसीबी टाकाऊ साहित्यापासून तयार केली असून त्यासाठी केवळ १५ रुपये खर्च आला़ शास्त्रज्ञ बनून देशसेवा करण्याची इच्छा त्याने व्यक्त केली़
इंद्रजितने बनविले ‘जेसीबी’
By admin | Updated: June 30, 2014 00:39 IST