औरंगाबाद : मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांकडून गेल्या अनेक वर्षांपासून मागणी केली जाणारी हुजूरसाहेब नांदेड- बिकानेर साप्ताहिक एक्स्प्रेस सोडण्याची घोषणा रेल्वे अर्थसंकल्पात करण्यात आली. ही गाडी औरंगाबादमार्गे चालविण्यात येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत होती; परंतु ही रेल्वे नांदेड- औरंगाबाद- मनमाड मार्गाऐवजी नांदेड- पूर्णा- अकोलामार्गे वळविण्यात आली आहे. यामुळे परभणी, जालना आणि पर्यटनाची राजधानी असलेले औरंगाबाद राजस्थानशी जोडले जावे, यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.औरंगाबाद हे पर्यटनक्षेत्र राजस्थानशी जोडले जावे, यासाठी औरंगाबादमार्गे बिकानेर रेल्वे सोडावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. विविध रेल्वे संघटनांकडून सदर रेल्वेसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत होते. यानुसार रेल्वे बजेटमधून हुजूरसाहेब नांदेड- बिकानेर साप्ताहिक एक्स्प्रेस मराठवाड्याच्या वाट्याला आली आहे; परंतु ही रेल्वे नांदेड- पूर्णा- अकोला- सुरतमार्गे धावणार आहे. या निर्णयामुळे परभणी, जालन्यासह जागतिक पातळीवर ओळख असलेल्या औरंगाबादच्या पर्यटक, सर्वसामान्य प्रवाशांवर अन्याय होईल, असे रेल्वे संघटकांनी म्हटले. औरंगाबाद- रेणिगुंठा- औरंगाबाद साप्ताहिक एक्स्प्रेस, हुजूरसाहेब नांदेड- औरंगाबाद साप्ताहिक एक्स्प्रेस या गाड्या सोडण्यात येत असल्या तरी हुजूरसाहेब नांदेड- बिकानेर साप्ताहिक एक्स्प्रेस औरंगाबादमार्गे सोडण्यात येत नसल्याने पर्यटनाची दोन स्थळे जोडली जाण्यासाठी आणखी किती दिवस प्रतीक्षा करावी लागणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.जनहित याचिका दाखल करणारआंतरराष्ट्रीय स्तराची दोन स्थळे जोडण्यापासून वंचित राहणार आहेत. ही रेल्वे औरंगाबादमार्गे सोडण्यात यावी, यासाठी पुढील आठवड्यात जनहित याचिका दाखल करण्यात येईल, असे मराठवाडा रेल्वे प्रवासी सेनेचे सदस्य राज सोमाणी म्हणाले.एक फेरी औरंगाबादमार्गे हवीएक आठवडा तिकडून तर एक आठवडा औरंगाबादमार्गे ही रेल्वे सोडण्याची गरज आहे. जनशताब्दी एक्स्प्रेस जालन्याहून सोडण्याचे नियोजन केले जात असल्याचे समजते. असे करताना या रेल्वेच्या बोगी वाढविण्याची गरज आहे, असे मराठवाडा रेल्वे विकास समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश वर्मा म्हणाले.