जालना : मंगळवारपासून बंद असलेल्या शहरातील सर्व रिक्षा गुरूवारी दुपारी तीननंतर धावू लागल्या आणि प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी रिक्षाचालकांच्या विविध मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन देतानाच ५६ थांब्यांच्या सुधारणांसाठी १० लाखांचा निधी देण्याची सूचना नगरपालिका प्रशासनाला केली. हा निर्णय होण्याआधी दुपारपर्यंत मात्र प्रवाशांची फरफट सुरूच होती.शहर पोलिसांकडून मारहाण होत असल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या रिक्षा युनियनने हा बंद पुकारला होता. अन्य रिक्षाचालकांनी पाठिंबा देत बंदमध्ये सहभाग नोंदविला होता. त्यामुळे प्रवाशांचे मात्र हाल सुरू झाले होते. गुरुवारी सकाळपासूनच रेल्वेस्थानक, बसस्थानकाबाहेर पडणाऱ्या प्रवाशांची रिक्षाचा शोध घेताना दमछाक होत होती. बसस्थानक आणि रेल्वेस्थानक परिसरात वाहतूक शाखेच्या काही अधिकाऱ्यांनी तेथील रिक्षाचालकांशी चर्चा करून बंद मागे घेण्याचे आवाहन केले. मात्र त्यावेळी रिक्षाचालक आपल्या निर्णयावर ठाम होते. परंतु दुपारी ३ वाजता रिपब्लिकन रिक्षा युनियनचे अध्यक्ष अॅड. ब्रह्मानंद चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पालकमंत्री बबनराव लोणीकर यांची सर्व्हे क्रमांक ४८८ मधील शासकीय विश्रामगृहासमोर भेट घेतली. पालकमंत्र्यांशी यावेळी विविध मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यात आली. रिक्षाचालकांना पोलिसांनी अचानक मारहाण करू नये, नगरपालिका व पोलिसांनी ठरविलेल्या थांब्यांना मंजुरी द्यावी व त्वरीत अंमलबजावणी करावी इत्यादी मागण्यांचा त्यात समावेश होता. या मागण्यांवर शुक्रवारी प्रशासनासमवेत होणाऱ्या बैठकीत चर्चा करून त्या सोडविण्यात येतील, असे आश्वासन पालकमंत्री लोणीकर यांनी दिल्यानंतर रिक्षाचालकांनी बंदचा निर्णय मागे घेतल्याचे जाहीर केले. यावेळी रिक्षा युनियनचे शहराध्यक्ष अनिल खिल्लारे, विजय खरात, संजय म्हस्के, सतीश वाहुळे आदी उपस्थित होते. हा संप मागे घेण्यात आल्याने जालनेकरांची कसरत अखेर थांबली.
हुश्श..! संपातून अखेर सुटका !!
By admin | Updated: January 16, 2015 01:06 IST