जालना : तालुक्यातील बाजीउम्रद येथील तलाठी बालाजी रावसाहेब नरवटे (वय २९) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी तक्रारदाराकडून साडेपाच हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. शेती समान तीन हिश्श्यामध्ये विभागणी करून अज्ञान पालनकर्ता म्हणून आईचे नाव असल्याने सातबाऱ्यावरून ते कमी करावयाचे होते. १६ मार्च रोजी सर्व कागदपत्रे घेऊन तलाठी नरवटे यांची भेट घेतली असता तक्रारदाराकडे तलाठी नरवटे यांनी १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती सहा हजार रुपये देण्याचे ठरले. त्यापैकी ५०० रुपये तक्रारदाराने त्याच दिवशी दिले. उर्वरीत साडेपाच हजार रुपये मुळ कागदपत्रे घेऊन जालना येथील रुपनगर भागात असलेल्या खोलीवर तलाठ्याने बोलावले. मात्र तक्रारदारास लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार सदर ठिकाणी बुधवारी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला. साडेपाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना बाजीउम्रद सज्जाचे तलाठी बालाजी रावसाहेब नरवटे (वय २९) यांना या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कार्यवाही पोलिस अधीक्षक डॉ. डी.एस. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक प्रताप शिकारे, पोलिस निरीक्षक व्ही.बी. चिंचोले, अशोक टेहरे, संतोष धायडे, किशोर पाटील, नंदू शेंडीवाले, प्रदीप दौंडे, अमोल आगलावे, संजय उद्गीरकर, प्रदीप उबाळे, रामचंद्र कुदर, संदीप लव्हारे, गंभीर पाटील, रमेश चव्हाण, महेंद्र सोनवणे यांनी पार पाडली. (प्रतिनिधी)
साडेपाच हजाराची लाच घेताना पकडले
By admin | Updated: March 19, 2015 00:15 IST