औरंगाबाद : प.पू. प्रभाकंवरजी म.सा. यांचा जन्म लोणार येथे दि. २ आॅगस्ट १९२७ साली झाला. १९४३ साली त्यांनी साध्वी होण्याचा निर्णय घेतला; परंतु परिवाराकडून विरोध झाल्याने त्यांनी कोर्टात जाऊन न्याय मागण्याचा प्रयत्न केला. रविवारी सुटीच्या दिवशीदेखील कोर्टाने त्यांचा विषय समजावून घेत त्यांना साध्वी होण्यासाठी परवानगी दिली. दूसऱ्याच दिवशी सोमवरी त्यांनी गुरू गणेश लालजी महाराज यांचे शिष्यत्व स्वीकारले व साध्वी होण्याची दीक्षा घेतली. त्यानंतर त्यांनी अनेक समाजोपयोगी कार्य करत समाजात धर्म, आचरण, संस्कृती आणि संघटन या विषयांसंदर्भात प्रचार आणि प्रसार केला. त्यांनी लब्धीधारी साध्वी ही पद्वी तसेच वाचाशक्ती प्राप्त केली. त्यांनी आपल्या कार्यकाळात ४५ शिष्यांना जैन भागवती दीक्षा प्रदान केली. विशेष म्हणजे त्यांनी ८ संतांनादेखील दीक्षा प्रदान करण्याचे महान कार्य केले आहे. संपूर्ण आयुष्यभर काटेकोरपणे संयमाचे पालन करीत त्यांनी समाजात दया आणि क्षमा हे विचार पोहोचविण्यासाठी अथक परिश्रम घेतले. प.पू. प्रभाकंवरजी म.सा. या नेहमी प्रसिद्धीपासून दूर राहिल्या. त्यांनी २० ते २५ पुस्तक लिहिली. एकही पुस्तक छापले नाही. यावरून त्यांच्या त्यागाचे आकलन होते. प.पू. प्रभाकंवरजी म.सा. यांनी मराठी, गुजराती, हिंदी, इंग्रजी, उर्दू, संस्कृत, प्राकृत आदी भाषा अवगत केल्या. विशेष म्हणजे ज्ञान आणि चारित्र्य यां विषयात त्यांचा अभ्यास होता. त्यावर त्या नेहमी प्रवचन करीत. त्यासोबतच जैन दर्शनातील ३२ आगमाचा (शास्त्र) अभ्यास त्या करीत असल्याने त्यांनी या विषयात प्रावीण्य मिळविले होते. गीता, कुराण, बायबल आदींसह विविध धर्मग्रं्रथांचे सखोल ज्ञान त्यांनी प्राप्त केल्याने त्यांची प्रवचने ऐकण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत असत.४प.पू. प्रभाकंवरजी म.सा. यांनी इंग्रजी आणि हिंदी या विषयांत एम.ए. पूर्ण केले होते. त्यासोबतच ज्योतिषशास्त्रातदेखील त्यांनी विशेष प्रावीण्य मिळविले होते. अशा विविध विषयांचा अभ्यास असल्याने प.पू. प्रभाकंवरजी यांनी आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, महाराष्ट्र आदी प्रदेशांमध्ये महान कार्य केले आहे.
प.पू. प्रभाकंवरजी म.सा. यांचे कार्य
By admin | Updated: September 2, 2014 01:55 IST