लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महापालिकेने मागील काही वर्षांमध्ये शहरातील जलवाहिन्यांची कशा पद्धतीने चाळणी केली, याचे सूक्ष्म निरीक्षण महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजेपी)कडून करण्यात आले.
आठ दिवसांपूर्वी मनपा प्रशासक आस्तिकुमार पांडेय यांनी पालिकेसह एमजेपीच्या अधिकार्यांची संयुक्त बैठक घेतली. त्यावेळी पाणीपुरवठा व्यवस्था सुधारण्याच्या दृष्टीने काय करता येईल, यासंदर्भात ऑडिट करण्याची सूचना एमजेपीला केली होती. त्याला एमजेपीने सहमती दर्शवली होती. मागील आठवडाभरात प्राधिकरणाने जायकवाडी येथील १०० व ५६ एमएलडी क्षमतेच्या अशा दोन्ही योजनांचे पंपगृह, बिडकीन येथील पंप, फारोळा जलशुद्धीकरण व नक्षत्रवाडी येथील एमबीआरची पाहणी केली. त्यानंतर सिडकोला पाणीपुरवठा करणार्या एक्स्प्रेस वाहिनीचीही पाहणी केली. गारखेडा, सूतगिरणी, पुंडलिकनगर येथील क्रॉस कनेक्शनची पाहणी करताना या भागात नेमके किती पाणी जाते, याचीही चाचपणी पथकाने केली. पाणीपुरवठ्यात नेमक्या कोणत्या सुधारणा करायला हव्यात, यासंबंधीचा अहवाल एमजेपीकडून मनपा प्रशासकांना सादर करण्यात येणार आहे.