लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरात हवेतील धूलिकणांचे प्रमाण खूप वाढले असून, औरंगाबादकरांना शुद्ध हवा मिळत नसल्याचा अहवाल प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला दिला आहे. यासाठी महापालिकेने युद्धपातळीवर उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही मंडळाने केली आहे. लवकरच शहरात विविध उपाययोजना करण्याचे आश्वासन मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी दिले आहे.प्रदूषण नियंत्रण मंडळाने राज्यातील १७ शहरांमध्ये हवेची तपासणी केली. औरंगाबाद शहरात स.भु. कॉलनी परिसर, जिल्हा सत्र न्यायलय, गजानन महाराज मंदिर परिसरात तपासणी करण्यात आली. या तपासणीत शहरातील हवेत बरेच प्रदूषण असल्याचे निदर्शनास आले. वाहनांमुळे होणारे अत्यंत धोकादायक असे प्रदूषणही तपासणीत निदर्शनास आले. हवेत धूलिकणांचे प्रमाणही गरजेपेक्षा अधिक असल्याचे लक्षात आले. औरंगाबादकरांना शुद्ध आणि ताजी हवा मिळावी यासाठी महापालिकेने ठोस कार्यक्रम हाती घ्यावा, अशी मागणी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिका-यांनी आज एका बैठकीत मनपाकडे केली. या बैठकीत कोणत्या उपाययोजना कराव्यात यावर चर्चा करण्यात आली. शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नाही. त्यामुळे खाजगी वाहनांचे प्रमाण वाढले आहे. मनपाने शहर वाहतूक बस सक्षम केल्यास यावर नियंत्रण मिळविता येईल, अशी अपेक्षा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिका-यांनी व्यक्त केली. रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात झाडे लावण्यात यावीत. शहरात ग्रीन झोनचे प्रमाण वाढविण्यात यावे. जिथे जिथे ग्रीन झोन आहे, त्यांना विकसित करावे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या सूचनेनुसार शहरात विविध उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी दिली. शहरात खड्डे खूप आहेत. त्यामुळे धूलिकणांचे प्रमाण वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. यावरही महापालिका गांभीर्याने विचार करीत असून, त्यावरही उपाययोजना करण्यात येतील.
शहरात धूलिकणांचे प्रमाण सर्वाधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 01:11 IST