जालना : पाच वर्षापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेला सासरच्या मंडळींने माहेराहून पैसे आण म्हणून त्रास दिला. आज २० सप्टेंबर रोजी तिचा साडीने गळा आवळून नवरा एकनाथ गणपत हरकळ याने खून केला. याप्रकरणी सिंदखेडराजा पोलीस ठाण्यात पाच जणांविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. जालना येथील कसबा भागात राहणारे भगवान आसाराम जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आपली मुलगी कविता हिचे लग्न पाच वर्षापूर्वी एकनाथ हरकळ सोबत लावण्यात आले होते. या दरम्यान, मुलबाळ झाले नसल्याने सासरच्या मंडळीने त्रास देऊन मारहान करण्यास सुरूवात केली. खून केल्यानंतर कविताचे प्रेत सरकारी दवाखान्यात आणले होते. सिंदखेड राजा येथे तुळशीदास चौधरी यांनी दूरध्वनीवरून जनार्धन जाधव या मयताच्या चुलत्यास कळविले. त्यानंतर सर्व नातेवाईक सरकारी दवाखाना येथे गेले.त्यावेळी गळ्यावर आवळल्याच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. ७० हजार रूपयांची मागणी एकनाथ हरकळ याने केली होती. यासाठी कविताला माहेरी तब्बल दीड वर्ष सोडून दिले होते. त्यामुळे आर्थिक स्थिती बिकट असतांनाही २५ हजार रूपये दिले होते. मात्र त्यानंतरही कविताने सासू लक्ष्मीबाई गणपत हरकळ, सासरा गणपत हरकळ सारखे त्रास देत होते. सिंदखेडराजा पोलीस ठाण्यात आरोपी एकनाथ हरकळ, लक्ष्मीबाई हरकळ, गणपत हरकळ, दिपक हरकळ, शारदा घोडके यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. एकनाथ हरकळ ला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकाराने मोठी खळबळ उडाली आहे. (प्रतिनिधी)
जालन्याच्या विवाहितेचा गळा आवळून खून
By admin | Updated: September 21, 2014 00:24 IST