वाळूज महानगर : गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या परतीच्या पावसाने आज वाळूज महानगरासह परिसरात दमदार हजेरी लावली. अचानक झालेल्या पावसामुळे प्रवासी, दुचाकीस्वार व व्यावसायिकांची चांगलीच तारांबळ उडाली. औरंगाबाद- नगर महामार्गावर झाड कोसळल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. पावसाळा संपत आला तरी अद्याप वाळूज महानगरात एकही समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले. दुबार पेरणी करूनही पाऊस न आल्याने खरिपाची काही पिके जागेवरच जळाली, तर काहींनी माना टाकल्या. त्यामुळे बळीराजा अधिक कर्जबाजारी झाला आहे. अपुऱ्या पावसामुळे नागरिक व मुक्या प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या परतीच्या पावसाने आज रविवार, ५ आॅक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता पंढरपूर, बजाजनगर, वाळूज, तीसगाव, वडगाव कोल्हाटी, रांजणगाव शेणपुंजी, वळदगाव इ. भागात अर्धा तास पाऊस झाला. पावसाबरोबरच हवा असल्याने पंढरपूर भाजीमंडईतील एका लाकडी व्यवसाय करणाऱ्या दुकानावरील पत्रे उडाले.
परतीच्या पावसाची दमदार हजेरी
By admin | Updated: October 6, 2014 00:42 IST