उस्मानाबाद : जिल्हा परिषदेअंतर्गत सुमारे ४२ प्राथमिक आरोग्य केंंद्र चालविली जातात. ग्रामीण जनतेला तातडीने आरोग्य सेवा मिळावी, हा यामागचा मुख्य उद्देश. परंतु, आजघडीला या आरोग्य केंद्रांवरच उपचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. मंजूर पदापैकी डॉक्टरांच्या ५० टक्के जागा रिक्त आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यातील चार आरोग्य केंद्रांना डॉक्टरच नाहीत. त्यामुळे आरोग्य सेवाच कोमात गेली की काय? असे चित्र निर्माण झाले आहे.ग्रामीण भागातील लोकांना वेळेवर आणि अत्यल्प शुल्कामध्ये आरोग्य सेवा मिळावी, यासाठी आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांचा जन्म झाला. सुरूवातील आरोग्य केंद्रांची संख्या ही बोटावर मोजण्याइतपतच होती. परंतु, आजा हा आकडा ४२ वर जावून ठेपला आहे. मागील दोन कोट्यवधी रूपये खर्च करून रूग्णालयासाठी टोलेजंग इमारती उभारण्यात आल्या आहेत. मात्र, डॉक्टरांच्या रिक्त रूग्णांना नाविलाझ म्हणून खाजगी दवाखान्याची पायरी चढावी लागत आहे. त्यामुळे शासनाने ज्या उद्देशानी आरोग्य केंद्र सुरू केली, तो उद्देश साध्य होताना दिसत नसल्याची संतप्त प्रतिक्रीया ग्रामस्थांतून उमटत आहे.जिल्हाभरात ४२ प्राथमिक आरोग्य केंद्र चालविली जातात. प्रत्येक केंद्रावर दोन या प्रमाणे वैद्यकीय अधिकाऱ्यांची ८४ पदे मंजूर आहेत. परंतु, प्रत्यक्षात ३८ डॉक्टरच कार्यरत आहेत. त्यामुळे आरोग्य सेवेचा पार बट्ट्याबोळ झाला आहे. २८ पदे रिक्त आहेत. तसेच १० पदवीधर शिक्षणासाठी गेले आहेत. ६ डॉक्टर विनापरवाना गैरहजर आहेत. तर उर्वरित दोन डॉक्टर रजेवर आहेत. त्यामुळेच आज आरोग्य केंद्र ही केवळ नावापुरतीच उरली आहेत. एखादा रूग्णाला दवाखान्यात दाखल केले तर तेथे डॉक्टर असतील याची शास्वती नसते. अन्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीतही काही वेगळे चित्र नाही. त्यांच्याही जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. या सर्व गोंधळी वातावरणामुळे सर्वसामान्य जनतेच्या दृष्टीकोनातून महत्वाची असलेली आरोग्य सेवा कोमात गेल्याचे दिसत आहे. (प्रतिनिधी)
आरोग्य सेवा ‘कोमात’ !
By admin | Updated: September 23, 2014 01:35 IST