नांदेड : जिल्ह्यात डेंग्यू रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी जिल्ह्यात १४ नोव्हेंबरपासून आरोग्य ग्रामसभा घेण्यात येत आहे. १९ नोव्हेंबरपर्यंत होणार्या या ग्रामसभेत डेंग्यू रोखण्यासाठी करावयाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत माहिती दिली जाणार आहे. तापाच्या रूग्णांची संख्या आढळलेल्या गावांमध्ये विशेष आरोग्य पथकांमार्फत सर्वेक्षणही केले जाणार आहे. जिल्ह्यात डेंग्यूचे रूग्ण काही प्रमाणात आढळले आहेत. जानेवारी २0१४ पासून आजपर्यंत जिल्ह्यात डेंग्यूचे ७0 रूग्ण आढळले आहेत. हे रूग्ण ग्रामीण भागात कमी आहेत. साथ स्वरूपात या रोगाची लागण नसली तरी त्यावर वेळीच आळा घालण्यासाठी आरोग्य विभागाने पाऊले उचलली आहेत. जि. प. सभागृहात जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकार्यांची बैठक घेण्यात आली. बैठकीस जि. प. चे आरोग्य समिती सभापती संजय बेळगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविकात जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. दुर्गादास रोडे यांनी जिल्ह्यातील आरोग्यविषयक बाबींची माहिती सादर केली. तर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिंदे यांनी जिल्ह्यात राबविण्यात येणार्या आरोग्य योजना, जिल्ह्याला दिलेले उद्दिष्ट आणि जिल्ह्यात झालेले काम याबाबत माहिती दिली. सभापती बेळगे यांनीही डेंग्यू व अन्य साथीचे रोग रोखण्यासाठी आणि ग्रामीण भागातील जनतेला आरोग्यसेवा देण्यासाठी वैद्यकीय अधिकारी, कर्मचार्यांनी मुख्यालयी रहावे असे आदेश दिले. जिल्ह्यात १९ नोव्हेंबरपर्यंत आरोग्य ग्रामसभा घेण्याबाबतचे निर्देश देण्यात आले. तसेच तापीचे रूग्ण वाढलेल्या गावांमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी विशेष आरोग्य पथक पाठवून सर्वेक्षण केले जाणार आहे. जिल्ह्यात दर शनिवारी कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. /(प्रतिनिधी) |