लातूर : मराठा समाजाला, मुस्लिम समाजाला पूर्वीच्या सरकारने आरक्षण दिले़ ते आरक्षण न्यायालयात टिकले नाही़ असा अपेक्षाभंग न करता सर्व बाबींचा अभ्यास करून, आरक्षण राज्य शासन देणार आहे़ अभ्यासामुळे आरक्षणाच्या घोषणेला विलंब होत आहे, असे प्रतिपादन गृह राज्यमंत्री प्रा. राम शिंदे यांनी बुधवारी येथे केले़ धनगर समाजाचा मेळावा दयानंद महाविद्यालयाच्या सभागृहात झाला. यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी आ़ अनिल गोटे होते़ गृह राज्यमंत्री शिंदे म्हणाले, नागपूर येथे झालेल्या मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजामुळे आपण मुख्यमंत्री झालो असल्याचे सर्वांसमोर जाहीरपणे कबूल केले. त्यावेळी त्यांनी १५ दिवसांत आरक्षण देण्याचे मान्य केले आहे. आजचा १७ वा दिवस आहे़ हे जरी सत्य असले तरी, त्यामागची कारणे धनगर समाजालाही कळली पाहिजेत. पूर्वीच्या सरकारने घाईगडबडीत मराठा, मुस्लिम समाजाला आरक्षण दिले़ त्याचा मोठा गाजावाजा झाला़ पण हे आरक्षण न्यायालयात टिकले नाही़ त्यामुळे मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ अद्यापही मिळत नाही़ ही स्थिती धनगर समाजाची होऊ देणार नाही़ सर्व घटनेतील तरतुदींचा तज्ज्ञांकडून अभ्यास केला जात आहे़ तो पूर्ण होताच हे आरक्षण जाहीर केले जाईल, असेही गृहराज्यमंत्री म्हणाले. अध्यक्षीय समारोपात आ़ अनिल गोटे म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, यशवंत होळकर यांचा इतिहास समाजाला अद्यापही माहिती नाही़ हा इतिहास येणाऱ्या पिढीला कळला पाहिजे, यासाठी पाठ्यपुस्तकात इतिहास आला पाहिजे. जिल्हास्तरावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने मुलींसाठी वसतिगृह शासनाने उभारावेत़ समाजाच्या प्रश्नासाठी सर्व नेत्यांनी राजकीय पक्ष सोडून समाजाच्या हितासाठी एकत्रित आले पाहिजे, असेही ते म्हणाले. मंचावर आ़ रामराव वडकुते, आ़ रामहरी रुपनर, आ़ संभाजी पाटील निलंगेकर, आ़ सुधाकर भालेराव, भाजपाचे प्रवक्ते गणेश हाके, डॉ़ सुभाष माने, डॉ़ सुभाष खेमनर, विठ्ठलराव रबदडे यांची उपस्थिती होती़ प्रास्ताविक नामदेव पाटील यांनी केले़ सूत्रसंचालन बाळकृष्ण धायगुडे यांनी केले़ (प्रतिनिधी)
धनगर समाजाला आरक्षण देणारच
By admin | Updated: January 22, 2015 00:43 IST