पोलिसांनी सांगितले की, सिडकोच्या गुलमोहर कॉलनीतील अखिलेश रामदास खरात (२०) हा विद्यार्थी शनिवारी मध्यरात्री मित्राचा वाढदिवस साजरा करून दुचाकीने सिडको चौकाकडून जळगाव रस्त्याने घरी जात होता. यावेळी ट्रिपलसीट दुचाकीस्वार आरोपींनी त्याला कट मारल्याने अखिलेश दुचाकीसह कोसळला. या घटनेत त्याच्या खांद्याला, हाताला आणि गुडघ्याला दुखापत झाली. यावेळी आरोपींनी त्याला मदत करण्याचा बहाणा करीत ते त्याला घेऊन एपीआय कॉर्नरजवळील पेट्रोलपंप ते एका हॉटेलच्या मध्यभागी रस्त्यावर घेऊन गेले. त्यांच्यापैकी एकाने त्याला घरी नातेवाइकांना फोन करून या घटनेची माहिती सांगण्यासाठी दबाव टाकला. यामुळे अखिलेशने खिशातील मोबाइल काढताच आरोपींनी त्याचा मोबाइल हिसकावून घेतला आणि ते दुचाकीवर बसून पळून गेले. या घटनेनंतर जखमी अखिलेशने रुग्णालयात उपचार घेतले आणि एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. आरोपींच्या दुचाकीचा क्रमांक त्याने पोलिसांना दिला असून, पोलिसांनी दुचाकी जप्त केली. आरोपींची पडताळणी सुरू केली.
चौकट
रस्त्यावरील गुन्हे वाढले
लिफ्ट देण्याच्या बहाण्याने महिलांच्या गळ्यातील दागिने पळविण्याच्या घटना ताज्या असताना मदतीच्या बहाण्याने तरुणाचा मोबाइल हिसकावून नेणे आणि अंगावर दुचाकी टाकून मारहाण करीत लुटमार करण्याच्या नवीन पद्धती गुन्हेगार वापरत आहेत.