संजय कुलकर्णी , जालनारेल्वे वॅगनद्वारे मालाची सर्वाधिक आवक होण्यामध्ये मराठवाड्यात तिसऱ्या क्रमांकाचे स्थानक असलेल्या जालना रेल्वेस्थानकावरील मालधक्का मोठमोठी खड्डे, धुळीचे साम्राज्य, अंधारामुळे कामगार आणि वाहतुकदारांनाही त्रासदायक ठरले आहे. दरमहा किमान १० रॅकद्वारे या मालधक्क्यावर विविध मालाची आवक होते. यामध्ये रेशनचा गहू आणि तांदूळ, खते, सिमेंट यांचा समावेश आहे. या मालाच्या वाहतुकीमुळे रेल्वे प्रशासनालाही मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळते. परंतु उत्पन्नाच्या तुलनेत सुविधांचा मोठा अभाव असल्याचे येथे आल्यानंतर दिसून येते. हमाल माथाडी कामगार संघटनेचे १४६ कामगार येथे कार्यरत आहेत. मागील तीन-चार वर्षांपूर्वी माल उतरविण्यात येतो, त्या प्लॅटफार्मवर विद्युत दिवेच नव्हते. मात्र त्याही वेळी ‘लोकमत’ ने वृत्त प्रकाशित करून पाठपुरावा केला होता. त्यानंतर तेथे दिवे लावण्यात आले. कामगार सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत काम करतात. प्लॅटफार्मवरील दिवे सुरू असले तरी गुडशेडसमोरील दिवे बंद असतात. त्यामुळे कामगारांना माल उतरविताना अडचण निर्माण होते. कारण प्लॅटफार्मवरही खड्डे असल्याने नजरचुकीने कामगारांचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मालाचे नुकसान होण्याचे प्रकार येथे वारंवार घडतात. गुडशेडच्या मागील बाजूने तर एकापाठोपाठ मोठमोठे खड्डे असल्याने ट्रकचे पार्ट निखळतात. परिणामी ट्रकचालकांना आर्थिक फटका बसतो. याच ठिकाणी रेल्वेस्थानकातील प्लॅटफार्म स्वच्छ केल्यानंतरचे पाणी येऊन छोट्या तळ्याच्या आकारात साचते. हा मालधक्का अनेक वर्षांपासून तसाच आहे. त्यामुळे त्याचे आधुनिकीकरण व्हावे, यासाठी काही कामांचा प्रस्ताव रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांकडे पाठविण्यात आल्याची माहिती माल वाहतूक कार्यालयातील अधिकारी पी. अशोक यांनी दिली. याबाबत रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, जिल्हाधिकारी यांची आगामी काळात बैठक होणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले. या कामांमध्ये प्राधान्याने नवीन गुडशेड आणि सिमेंट रस्त्यांचा समावेश आहे.मराठवाड्यात नांदेड, औरंगाबाद या स्थानकानंतर जालना येथील स्थानकावर मालाची सर्वाधिक आवक होते. त्यामुळे स्थानकाला त्याद्वारे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर मिळते. त्या तुलनेत येथे मोठ्या सुविधांचा अभाव जाणवतो. मालधक्क्याचा परिसर सुमारे दीड कि़मी. चा आहे. मात्र या परिसरात एकाच ठिकाणी कामगारांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे दिवसभर श्रम करणाऱ्या कामगारांना पिण्याच्या पाण्यासाठीही दूर अंतरावर यावे लागते. धुळीचे साम्राज्य४मालधक्क्यावर धुळीचे साम्राज्य मोठ्या प्रमाणावर आहे. शेकडो ट्रकद्वारे येथून माल उचलून नेला जातो. त्यामुळे एकापाठोपाठ एक ट्रकची वाहतूक येथून सुरूच असते. त्यामुळे सतत धुळीचे लोट उडत असतात. कामगारांना तर नाकातोंडाला रुमाल बांधल्याशिवाय काम करणे शक्य होत नाही. एवढेच नव्हे तर या धुळीचे लोट शेजारी असलेल्या प्लॅटफार्मपर्यंत उठतात. त्याचा त्रास होतो. गुडशेडसमोरच अंधार४मालधक्का परिसरात दिवे लावण्यात आले. परंतु गुडशेडसमोर एकच दिवा लावण्यात आला. परंतु तोही बंद असतो. त्यामुळे सायंकाळनंतर अंधारातच कामगारांना माल उतरविण्याची वेळ येते. परिणामी कधीकधी मालाची नासाडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या बाबीकडे प्राधान्याने लक्ष देणे गरजेचे असल्याचे येथील काही हमाल मापाडींनी सांगितले. रस्ते की मोठमोठे खड्डे४मालधक्क्यावर जायचे म्हटले की, रस्त्याने जायचे की, मोठमोठे खड्डे पार करत जायचे, हे तिथे गेल्यावरच ठरेल. कारण येथे रस्तेच नाहीत, असे म्हटले तर वावगे होणार नाही. ट्रकच्या पार्किंगसाठी स्वतंत्र अशी व्यवस्था नाही. ट्रक वळवून घेताना अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वी मालधक्क्यालगत अपघाताची घटना घडलेली आहे. त्यामुळे मालधक्क्यासाठी स्वतंत्र जागा असणे आवश्यक असल्याचे काही चालकांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.
अडचणींचा मालधक्का
By admin | Updated: November 12, 2014 00:24 IST