भास्कर लांडे, हिंगोलीअर्धा पावसाळा लोटला असताना मागील वर्षीच्या तुलनेत यंदा सातपटीने पाऊस कमी पडला. कशीतरी अग्नीवर उगवलेली पिके आता पाण्याअभावी सुकण्यास सुरूवात झाली. आधीच उशिराच्या पेरणीमुळे अधिक उत्पादनाची शक्यता नसताना चाराटंचाईनेही डोके वर काढले. त्यातच चार दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने आहे त्या पिकांनी माना टाकून दिल्याने उत्पादकांच्या नजरा आभाळाकडे लागल्या. मृगनक्षत्राला २ महीने झाले असताना दिडशे मिमीच्या वर पाऊस झाला नाही. गत वर्षी आजघडीला विक्रमी ८१७ मिमी पाऊस झाला होता. मूग, उडीदाने शेंगा तर कापसाने पाते धरण्यास सुरूवात केली होती. यंदा दिड महिन्याच्या उशिरानंतर झालेल्या पेरणीअंती कसेतरी बियाणे उगवले. यंदा सुरूवातीपासूनच पावसाने परीक्षा बघितल्याने अनेक ठिकाणी दुबार पेरणीचे संकट ओढवले. त्यातून वाचलेल्या शेतकऱ्यांना उघाडीच्या संकाटाला सामोरे जावे लागले. जेमतेम वीस दिवसांच्या पिकांना दोनदा पावसाच्या खंडाचा सामना करावा लागला. सड्यासारखा पाऊस झाल्याने ओलीला ओल गेली नसल्याने पिकांना कडक ऊन सहन होत नाही. परिणामी कोवळ्या पिकांनी माना टाकण्यास सुरूवात केल्याने खरीपाच्या तीन लाख हेक्टरवरील पिके धोक्यात आली. पिके कमजोर असल्याने सर्वाधिक क्षेत्रावरील सोयाबीनवर ‘यलो मौजा’चा प्रादूर्भाव झाला. कापसावर मावा तर तूर, मूग, उडीदाची वाढ खुंटली. पावसाची शक्यता नसल्याने फवारणी करण्यासही उत्पादक धजावत नाही. ओलाव्याअभावी पिकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती राहिली नसल्यामुळे धुरळणीचा फायदा होत नाही. यंदा कशातच काही नसल्याने शेतकऱ्यांनी शेताकडे जाण्यास बंद केले. मागील चार दिवसांपासून पावसाने पाठ फिरविली. थोडाही पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांनी पान्हावलेल्या डोळ्यांनी आभाळाकडे बघण्यास सुरूवात केली. उत्पादकांवर दुहेरी संकटचारा आणि पाणी नसल्याने शेतकतरी दुहेरी संकटात सापडला असताना एकामागून एक पावसाची नक्षत्रे कोरडी जात आहेत. अद्यापही जिल्ह्यातील एकाही नदी, नाले ओढा वाहिलेला नाही. दिवसेंदिवस पाण्याची पातळी खालावत असताना नवीन गवत उवगले नाही. जूना कडबा संपल्याने चाराटंचाईने डोके वर काढले. शेकडा २ हजार रूपये दराने कडबा विकत घेणे शक्य नसल्याने पशूपालकांनी बाजार जवळ केला.
अर्धा पावसाळा कोरडा;डोळे आकाशाकडे
By admin | Updated: August 10, 2014 01:31 IST