जिंतूर : मुंजीच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी घरातून बाहेर पडलेल्या भाग्यश्री अवचारे या महिलेच्या पर्समधील दागिने बसमधून अज्ञात चोरट्यांनी पळविले. या दागिन्यांची किंमत ५ लाख ४८ हजार ५०० रुपये एवढी आहे. ही घटना ११ मे रोजी घडली. या प्रकरणी जिंतूर पोलिस ठाण्यात १४ मे रोजी रात्री गुन्हा दाखल झाला. याबाबतची माहिती अशी की, बोरी येथील भाग्यश्री अवचारे ह्या धुळे-मालेगाव येथे मुंज कार्यक्रमासाठी जिंतूर येथून नांदेड- औरंगाबाद या बसमध्ये बसल्या होत्या. साधारणत: शहरापासून १० ते १२ कि.मी. अंतरावर गेल्यानंतर महिलेला तिच्या हॅन्डपर्सची चैन उघडल्याचे दिसले. त्यांनी पर्समध्ये हात घालून पाहिला असता पांढर्या रुमालात गुंडाळून ठेवलेले सोन्याचे दागिने पळवून नेल्याचे लक्षात आले. यामध्ये तीन तोळ्याचे मंगळसूत्र (किंमत ९० हजार रुपये), पाच तोळ्याच्या बांगड्या (किंमत १ लाख ५० हजार रुपये), एक तोळ्याचे गंठण (किंमत ३० हजार रुपये), चार तोळ्याच्या पाटल्या (१ लाख २० हजार रुपये), ५ ग्रॅम सोन्याचे झुमके (किंमत १५ हजार रुपये), सोन्याचे दोन लॉकेट (प्रत्येकी १ तोळा किंमत ६० हजार रुपये), सोन्याची अंगठी (५१ हजार रुपये), ७ ग्रॅमची अंगठी (२१ हजार रुपये) व रोख ५ हजार रुपये असा एकूण ५ लाख ४८ हजार ५०० रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी पळवून नेला. संबंधित महिलेने याबाबतची तक्रार जिंतूर पोलिस ठाण्यात १४ मे रोजी दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)
साडेपाच लाखांची पळविली पर्स
By admin | Updated: May 16, 2014 00:19 IST