परभणी: परभणी आणि जिंतूर विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांशी काँग्रेसचे निरीक्षक आ. विवेक बन्सल यांनी संवाद साधला. जिंतूरमध्ये आ.रामप्रसाद बोर्डीकर हे एकटेच इच्छुक होते. तर परभणीत मात्र दीड डझन इच्छुकांनी निवडणूक लढविण्याची तयारी दाखविली.उत्तर प्रदेश विधान परिषदेचे सदस्य विवेक बन्सल यांनी १७ जुलै रोजी जिंतूर विधानसभा मतदारसंघासाठी आणि १८ जुलै रोजी परभणी विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांशी संवाद साधत त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. जिंतूर येथे काँग्रेसचे विद्यमान आ.रामप्रसाद बोर्डीकर यांच्या व्यतिरिक्त कुणीही निवडणूक लढविण्यासाठी तयारी दाखविली नाही, परभणीत मात्र इच्छुकांची भाऊगर्दी पहावयास मिळाली. परभणी येथील सावली विश्रामगृहावर सकाळी १० वाजता हा कार्यक्रम पार पडला. ऐनवेळी काँेग्रेस निरीक्षकांचा कार्यक्रम आल्यामुळे अनेक इच्छुकांना बाहेरगावी असल्यामुळे प्रत्यक्ष संपर्क साधता आला नाही. विवेक बन्सल हे या दोन्ही मतदारसंघातील काँग्रेसच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आले होते. परंतु, ते येणार हे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर इच्छुक आणि त्यांच्या समर्थकांनी सावली विश्रामगृहावर गर्दी केली. त्यामुळे या बैठकीला इच्छुकांच्या मुलाखतीचे स्वरुप प्राप्त झाले होते. जवळपास १७ जणांनी परभणी विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक लढविण्याची तयारी दर्शवित आपला बायोडाटा निरीक्षकांना सादर करीत आपणच कसे योग्य उमेदवार आहोत आणि निवडून येऊ शकतो, याची चर्चा केली. ही उमेदवारी मागताना अनेकांनी जात, पात, धर्माची समिकरणे मांडली. कुणी युवकांसाठी तर कुणी ज्येष्ठांसाठी, काही जणांनी ही जागा अल्पसंख्यांकासाठी तर काहींनी ही जागा ओबीसीसाठी सोडण्याची मागणी केली. आजच्या या कार्यक्रमास इच्छुकांमध्ये उत्साह दिसून आला. आ.विवेक बन्सल यांनीही यापूर्वीच्या निवडणुकीतील आकडेवारी घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. गेल्या काही निवडणुकांपासून मतविभागनीमुळे परभणी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला शिवसेनेकडून पराभव स्वीकारावा लागत आहे, याचीही कारणमीमांसा झाली. (जिल्हा प्रतिनिधी)१५ इच्छुकांनी घेतली भेटशुक्रवारी ज्यांनी पक्ष निरीक्षकांना निवडणूक लढविण्यासंदर्भात बायोडाटा दिला. त्यांची संख्या १७ होती. या १७ जणांमध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ.सुरेशदादा देशमुख, परभणी बाजार समितीचे उपसभापती आनंद भरोेसे, जिल्हा बँक, बाजार समितीचे संचालक तथा मनपा गटनेते भगवानराव वाघमारे, माजी खा. तुकाराम रेंगे पाटील, माजी नगराध्यक्ष विखार अहेमद खान, शहराध्यक्ष नदीम इनामदार, गफ्फार मास्टर, रविराज देशमुख, सिद्धार्थ हत्तीअंबिरे, बाळासाहेब देशमुख, इरफान उर रहेमान खान, रवी पतंगे, मुखीम काजी, गौस बागवान, माजी नगराध्यक्ष बंडू पाचलिंग यांचा समावेश होता, अशी माहिती जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब फुलारी यांनी दिली. परभणीसाठी माजी आ.कुंडलिक नागरे, डॉ.विवेक नावंदर हे देखील इच्छुक होते. परंतु, बाहेरगावी असल्यामुळे ते या बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत, अशी माहिती मिळाली.
दीड डझन इच्छुक
By admin | Updated: July 19, 2014 00:39 IST