औरंगाबाद : शासकीय कला महाविद्यालयाशेजारी नियोजित हज हाऊस आणि वंदे मातरम् सभागृहाच्या उभारणीचे काम लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. सिडकोकडून आठवडाभरातच दोन्ही कामांच्या निविदा काढण्यात येणार आहेत.नियोजित हज हाऊस आणि वंदे मातरम् सभागृहाच्या अनुषंगाने मंगळवारी मुंबईत मंत्रालयात आढावा बैठक झाली. अल्पसंख्याक विकास खात्याचे मंत्री आरेफ नसीम खान, पशुसंवर्धनमंत्री अब्दुल सत्तार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली. बैठकीला जिल्हाधिकारी विक्रमकुमार, सिडकोचे मुख्य प्रशासक सुनील केंद्रेकर, मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे व संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. हज हाऊस आणि वंदे मातरम् या दोन्ही वास्तू शेजारीशेजारी उभारण्यात येणार आहेत. हे काम सिडकोकडून करण्यात येणार असून, त्यासाठी निधीची तरतूदही आधीच झालेली आहे. शासकीय कला महाविद्यालयाशेजारील ४ एकर जागेपैकी पूर्वेकडील २ एकरवर वंदे मातरम् सभागृह आणि पश्चिमेकडील २ एकरवर हज हाऊस उभे राहील. या जागेवरील ५३ अतिक्रमणे काही दिवसांपूर्वीच हटविण्यात आली. अतिक्रमणधारकांना पडेगाव येथे प्लॉट देण्यात आले असून, त्यावर घर बांधण्यासाठी प्रत्येकी २ लाख रुपयांचा निधीही देण्यात आला आहे. तसेच महापालिकेमार्फत पडेगाव येथील जमिनीवर रस्ते, पाणी, ड्रेनेज आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता या कामातील सर्व अडथळे दूर झाले असल्याचे अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले. तसेच सिडकोने आठवडाभरात दोन्ही कामांच्या निविदा जारी करण्याची तयारी दाखविली असल्याचे सूत्रांनी सांगितले. दोन्ही वास्तूंच्या कामांना एकाच वेळी सुरुवात केली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आधीच जाहीर केलेले आहे. त्यानुसार दोन्ही वास्तूंचा भूमिपूजन समारंभ एकाच दिवशी होणार असून, त्यावरही बैठकीत चर्चा झाली.भूमिपूजनासाठी कोणतीही अडचण नाही. पदवीधर निवडणुकीची आचारसंहिता आठवडाभरात संपणार आहे. यानंतर केव्हाही भूमिपूजन समारंभ घेता येऊ शकतो, असे अधिकाऱ्यांनी सुचविले. दरम्यान, प्रशासनाने तशी तयारी सुरू केली असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
हज हाऊस, वंदे मातरम् सभागृह कामाची निविदा आठवडाभरात
By admin | Updated: June 19, 2014 00:53 IST