पाथरी : येथील रेणुका शुगर साखर कारखाना कार्यक्षेत्रात यावर्षी सहा लाख मे. टनापेक्षा अधिक उसाची उपलब्धता आहे. चालू वर्षीचा गळीत हंगाम सुरू होतो की नाही? याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आतापासूनच चिंता वाढली आहे. पाथरी तालुका हा ऊस क्षेत्राचे भांडार म्हणून ओळखला जातो. मागील पंचवीस वर्षापासून या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड करतात. या भागातील सहकारी तत्वावरील कारखाना सुरुवातीच्या कालावधीत स. गो. नखाते यांच्या नेतृत्वाखाली व्यवस्थितरित्या चालला. परंतु नंतरच्या कालावधीत कारखान्याला राजकारणाची घरघर लागली आणि आज या कारखान्याची अत्यंत वाईट अवस्था झाली. २००८ साली सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार हा कारखाना परभणीच्या रत्नप्रभा शुगरला चाालविण्यासाठी ताब्यात देण्यात आला. कालांतराने रत्नप्रभा ही संस्था कर्नाटकातील रेणुका शुगरकडे वर्ग झाल्याने रेणुका शुगरच्या माध्यमातूून हा कारखाना चालविण्यात येतो. चार गळीत हंगाम रेणुका शुगरने यशस्वीरित्या चालविले खरे. परंतु गतवर्षीचा गळीत हंगाम सुरू होऊ शकला नाही. कामगार आणि व्यवस्थापनातील वाद विकोपाला गेल्याने कारखान्यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले. गतवर्षी या भागात चांगला पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी ०३१०२ या उसाच्या नवीन वाणाची ५ हजार रुपये प्रतिटन खर्च करून ऊस लागवड केला. या भागात चालू वर्षीच्या गळीत हंगामामध्ये ६ लाख मे.टनपेक्षा अधिक ऊस उपलब्ध आहे. यामुळे चालू वर्षीचा गळीत हंगाम सुरू करणे आवश्यक आहे. गळीत हंगाम सुरू झाला नाही तर या भागातील शेतकऱ्यांना ऊस गाळपासाठी अनेक यातना सहन कराव्या लागणार आहेत. (वार्ताहर)गतवर्षीच्या उसाचा वाढीव हप्ता नाही मराठवाड्यातील काही कारखान्यांनी गतवर्षी गाळप झालेल्या उसाला २०० रुपये वाढीव हप्ता दिला. परंतु या भागातील या कारखान्याने गतवर्षी गाळप झालेल्या उसाला वाढीव हप्ता दिला नाही. त्याच बरोबर या भागातून बाहेरील कारखान्यास गाळपास गेलेल्या उसालाही वाढीव हप्ता देण्यात आला नाही. तातडीने निर्णय होणे आवश्यककारखान्याचा गळीत हंगाम सुरू करण्याचा कालावधी कमी राहिला आहे. यावर्षी गळीत हंगाम सुरू करायचा असेल तर याबाबत तातडीने निर्णय होणे आवश्यक आहे. अन्यथा ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठी चिंता वाढणार आहे. आंदोलनास गती गरजेचीरेणुका शुगर कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी माजी आ. हरिभाऊ लहाने यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्याची भूमिका घेतली असली तरी कारखाना सुरू होईपर्यंत हे आंदोलन गतिमान होणे आवश्यक आहे. कारखान्यासाठी शेतकरी कधीही एकत्र येतात, असा पूर्वीचा अनुभव आहे.
सहा लाख मे.टन ऊस उभा
By admin | Updated: June 28, 2014 01:14 IST