औरंगाबाद : चोरट्या मार्गाने शहरात गुटखा आणून त्याची दामदुप्पट दराने काळ्याबाजारात विक्री करणाऱ्या स्टॉकिस्टांवर पोलिसांनी शुक्रवारी धाडसत्र सुरू केले. दोन ठिकाणी छापे मारून पोलिसांनी तब्बल १६ लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. तिघांना अटकही केली. राज्यात गुटखा विक्रीवर शासनाने बंदी घातलेली आहे. तरीही परराज्यांतून चोरट्या मार्गाने गुटखा आणून तो शहरात दामदुप्पट दराने राजरोसपणे विकण्यात येतो. शहरातील बहुतांश पानटपऱ्या, किराणा दुकानांवर हा गुटखा मिळतो. शहरातील जुना मोंढा येथील राज प्रोव्हिजनचा चालक शेख नदीम शेख नईम (२६, रा. कटकटगेट) याच्या दुकानाच्या बाजूलाच एक गोदाम आहे. तेथे गुटख्याचा मोठा साठा आहे, अशी माहिती गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलीस उपायुक्त वसंत परदेशी, सहायक आयुक्तबाबाराव मुसळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अविनाश आघाव, शिवा ठाकरे, फौजदार सुभाष खंडागळे, सहायक फौजदार गौतम गंगावणे, द्वारकादास भांगे, गोकुळ वाघ, रामदास गाडेकर, नवनाथ परदेशी, बाळासाहेब राठोड व त्यांच्या सहकाऱ्यांनी अन्न-औषधी प्रशासनाच्या मदतीने या गोदामावर शुक्रवारी सायंकाळी छापा मारला. त्यावेळी तेथे तब्बल १२ लाख रुपये किमतीचा गुटख्याचा साठा आढळून आला. हा साठा करणाऱ्या शेख नदीमला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली. औरंगाबाद : जुन्या मोंढ्यापाठोपाठ पोलीस उपायुक्त वसंत परदेशी यांच्या पथकाने किलेअर्क परिसरातील एका गोदामावर सायंकाळी छापा मारला. तेथे तब्बल चार लाखांचा गुटखा सापडला. हा साठा करणाऱ्या गजानन शंकर खरे व शेख वसीम शेख गफ्फार या दोघांना पकडण्यात आले. रात्री उशिरापर्यंत या कारवाईप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
गुटख्याच्या स्टॉकिस्टवर धाडसत्र
By admin | Updated: September 6, 2014 00:41 IST