औरंगाबाद : कारागृहातील गरीब आणि गरजू कैद्यांना कायदेविषयक साह्य मिळण्यासाठी विविध शासकीय यंत्रणा आणि सामाजिक भान असलेल्या वकिलांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मानवी हक्क विश्लेषक अॅड. असीम सरोदे यांनी केले. हर्सूल कारागृहात आयोजित कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरात प्रमुख मार्गदर्शक म्हणून अॅड. सरोदे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कारागृह अधीक्षक विनोद शेकदार, उपअधीक्षक भोसले, अॅड. विकास शिंदे, अॅड. महेश भोसले आणि अॅड. विजय भुमरे यांची उपस्थिती होती. प्रत्येक गरजू आणि गरीब कैद्याची बाजू न्यायालयात योग्य पद्धतीने मांडली, तर न्यायतत्त्वाची अंमलबजावणी जोरकसपणे प्रत्यक्षात येईल आणि कारागृह विभागावरील मोठा ताण कमी होण्यास मदत होईल, असे मत यावेळी अॅड. सरोदे यांनी व्यक्त केले. जन्मजात कोणीही गुन्हेगार नसतो. परिस्थितीमुळे चुका झालेल्यांना त्याची बाजू मांडण्याची संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत, असे यावेळी अॅड. भोसले यांनी नमूद केले.