जालना : जिल्ह्यातील कृषीपंपांना महावितरणकडून वीजपुरवठा देण्यास टाळाटाळ होत असल्याने शेतकरी कमालीचे त्रस्त आहेत. महावितरणच्या कार्यालयात अनेकदा पाठपुरावा करुनही शेतकऱ्यांना तारीख पे तारीख दिली जात आहे.जिल्ह्यातील दोन हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी तीन, पाच व साडेसात अश्वशक्तीचे पंप चालविता यावेत, म्हणून वीजपुरवठ्यासाठी कागदत्रांची पूर्तता केलेली आहे. असे असूनही महावितरणकडून दररोज टोलटोलवाची उत्तरे दिली जात आहेत. जिल्ह्यातील महावितरणच्या सर्वच कार्यालयात शेतकऱ्यांना टोलवाटोलवीची उत्तरे दिली जात आहेत.पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांनी ठिबकवर लागवड केली आहे. कपाशीला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना विजेची नितांत गरज आहे. शेतकऱ्यांना ठेकेदारकडे सर्व ही जबाबदारी देण्यात आल्याचे सांगितले जाते. काही वेळा खांब नाहीत, तारा नाहीत, लाईन ओढण्यासाठी कर्मचारीच नाहीत, अशी उत्तरे ऐकावयास मिळतात. शेतकऱ्यांची परिस्थिती तसेच अनेक दिवसांचा पाठपुरावा पाहता प्रतीक्षा यादीनुसार शेतकऱ्यांना तात्काळ वीजपुरवठा द्यावा, अशी मागणी होत आहे.
शेतीपंपाना वीजपुरवठा मिळेना
By admin | Updated: June 28, 2014 01:17 IST