मोहन बारहाते, मानवततालुक्यात झालेल्या गारपिटीची शासनाकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी. मात्र बँकेच्या व्यवहारात प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत ही मदत पोहचलीच नाही. आजही सुमारे आठ ते साडेआठ हजार शेतकरी सभासद गारपिटीच्या मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. एप्रिल २०१४ मध्ये म्हणजे पहिल्या आठवड्यातच गारपीट, वादळी व पाऊस झाला होता. या नैसर्गिक संकटानंतर शेतकऱ्यांचे गहू, ज्वारी, करडई, तूर आदी पिकांसह केळी, संत्रा, मोसंबी या फळबागांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या मोठ्या नैसर्गिक संकटाची दखल घेत कृषीमंत्री व राज्याचे मंत्री, केंद्रीय पाहणी पथक तालुक्यात येऊन गेले. नुकसानीचा अंदाज घेतल्यानंतर शासनस्तरावरून आदेश काढून प्रशासनाला नुकसानीचे पंचनामे करण्यास सांगितले. महसूल विभागाने सब घोडे बारा टक्के या न्यायाने फळबाग व धान्य पिकांचे पंचनामे करून सर्वांना न्याय दिल्याचे मनोमन मानून घेतले. त्यानंतर या पंचनाम्याच्या आधारावर नुकसान भरपाईचे आकडे टाकून या याद्या बँकेमध्ये पाठविण्यात आल्या. परंतु बँकांकडून अजूनही शेतकऱ्यांंना नुकसान भरपाईची मदत मिळाली नाही. आजही मानवतच्या मुख्य शाखेवरून सुमारे साडेआठ हजारांपर्यंत सभासद शेतकऱ्यांना मदत मिळणे बाकी आहे. शासकीय कर्मचारी त्यांच्यापुढे आलेले काम हातावेगळे करून मोकळे होतात आणि नंतर त्याबद्दल त्यांची विस्मृती होते. शिवाजी सावंतांच्या मृत्यूंजय कादंबरीमध्ये या विषयावर वाक्य होते. ते असे ईश्वराने मानवाला सर्वात मोठी दिलेली देणगी म्हणजे विस्मृती होय. विस्मृती नसती तर विविध स्मृतींच्या ससेमिऱ्याने माणूस वेडा झाला असता, अशीच काहीशी स्थिती शासकीय कर्मचाऱ्यांची आहे. त्यांनी सर्वच लक्षात ठेवायचे म्हटले तर कर्मचारी वेडे होऊन जातील, म्हणूनच की, काय? प्रत्येक अधिकारी माहिती विचारली असता फाईल बघून सांगतो, असे म्हणतात. यावर्षी अगोदरच पेरण्यांना एक महिना उशिर झाला आहे आणि शासनाची मदत अजूनही गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या हाती नाही. पेरणी जर जून महिन्यामध्ये झाली असती तर आणखी किमान सात ते आठ हजार शेतकऱ्यांना रक्कम मिळाली नसती. अगोदरच मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांना खरोखरच आर्थिक मदतीची गरज आहे. परंतु उशिरा होणाऱ्या पेरणीच्या तोंडावरही शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांची उदासिनताबँकेचे व्यवस्थापक, तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी यापैकी कोणासही या गारपिटी क्षतीग्रस्त झालेल्या पिकांच्या शेतकऱ्यांच्या सभासदांची संख्या कोणासही मुखपाठ नाही. यापैकी प्रत्येक जण पहावे लागेल, नक्की सांगता येत नाही, फाईल बघून सांगतो, मी कार्यालयात नाही, अशी उत्तरे देऊन मोकळे होतात. जगाचा पोशिंदा म्हणून ज्याचा गाजावाजा होतो त्या शेतकऱ्यांवर कधी नव्हे ते आस्मानी संकट कोसळले. या संकटाने शेतकरी शरीराने, मनाने आणि धनाने पूरता कोलमडून पडला. मात्र ज्याच्या जीवावर सगळे जग जगते त्याच्याबद्दल कोणालाही आस्ता नाही.
नुकसान भरपाई मिळेना
By admin | Updated: July 10, 2014 00:43 IST