गंगाराम आढाव , जालनाजिल्ह्यात एकून साखर कारखान्यांपैकी पाच कारखान्यांचे यावर्षीच्या गळीप हंगामात बॉयलर पेटले असून या कारखान्यांसमोर आता उस आणावा तरी कोठून असा यक्ष प्रश्न उभा राहिला आहे. दरम्यान, या पाच कारखान्यांंचे गाळपाचे उद्दीष्ट सुमारे २० लाख मे. टन एवढे असून प्रत्यक्षात जिल्ह्यात सुमारे साडेपाच ते सहा लाख मे. टन ऊस उभा आहे. त्यामुळे गाळपाचा पल्ला गाठण्याकरिता या पाचही कारखान्यांना मोठी रस्सीखेच करावी, लागेल, अशीच चिन्हे आहेत. जिल्ह्यात चार सहकारी आणि दोन खाजगी साखर कारखाने आहेत. त्यापैकी जालना सहकारी साखर कारखाना (रामनगर) हा बंद आहे. तो पूर्वीच अवसायानात निघाला असून त्याचा लिलावही झालेला आहे. परंतु तो अद्याप कार्यान्वित झाला नाही. अन्य पाच कारखाने यावर्षीच्या गळीत हंगामासाठी सज्ज असून त्यांचे बॉयलर पेटून प्रत्यक्ष गाळपासही सुरुवात केली आहे. परंतु या पाचही कारखान्यांसमोर ऊसाचा मोठा पेच उभा राहिल, अशी चिन्हे आहेत. जिल्ह्यात २० हजार ४०१ हेक्टर ऊसाचे क्षेत्र आहेत. त्यापैकी २०१३ - १४ साली ३९ टक्के म्हणजे ७ हजार ९९२ हेक्टरवर उसाची लागवड झालेली आहे. अपूरा पाऊस आणि दुष्काळी परिस्थितीमुळे उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटले आहे. असे असले तरी या वर्षी जिल्ह्यात दोन कारखान्यांची भर पडली आहे. त्यात परतूर येथील बंद पडलेला बागेश्वरी साखर कारखाना, पुणे येथील एका खाजगी कंपनीने लिलावात विकत घेतला. देखभाल दुरुस्तीनंतर हा कारखाना यावर्षी पहिल्यांदाच गाळप करीत आहेत. या कारखान्याने ३ लाख टन उसाचे गाळप करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. त्या तुलनेत मात्र कार्यक्षेत्रात २३६ हेक्टरवर म्हणजे १५ ते २० हजार मे. टन ऊस उभा आहे.भोकरदन येथील रामेश्वर सहकारी साखर कारखान्याने ४ लाखाचे उद्दीष्ट ठवेलेले आहे. मात्र कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ३८१ हेक्टर क्षेत्रात म्हणजेच फक्त २२ ते२५ हजार टन ऊस उभा आहे.घनसावंगी तालुक्यात तीन साखर कारखाने आहेत. त्यात समर्थ आणि सागर सहकारी कारखाना या दोन्ही कारखान्यांनी एकूण ८ लाख टन उस गाळपाचे उद्दीष्ट ठेवलेले आहे. तर समृद्धी ह्या खाजगी कारखान्याने ४ लाख टन उस गाळपाचे उद्दीष्ट ठवलेले आहे. परंतु या तिन्हीही कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात फक्त ६ हजार १३१ हेक्टर वर म्हणजेच पाच ते साडेपाच लाख टन ऊस उभा आहे.एकूणच पाचही साखर कारखान्यांचे १९ लाखांचे उस गाळपाचे उद्दीष्ट असल्याने ते गाळपाचा पल्ला कसा गाठणार? हाच उत्सूकतेचा विषय ठरतो आहे. कार्यक्षेत्रासह कार्यक्षेत्राबाहेरील गेटकेन ऊसावरच या कारखान्यांची दारोमदार अवलंबून राहणार आहे. जिल्ह्यातील पाचही साखर कारखान्यांना उसाचा प्रश्न भेडसावणार आहे. कारखान्यांनी गाळपाचे ठेवलेले उद्दिष्टे पार करण्यासाठी त्यांना जिल्हा बाहेरून उस आणल्याशिवाय पर्याय नाही,असे चित्र सध्या जिल्ह्यात आहेत. कारण मागील तीन वर्षांपासून जिल्हा दुष्काळाच्या छायेत आहेत. त्यामुळे उसाच्या क्षेत्रात मोठी घट झालेली आहे. जिल्ह्यात फक्त ३९ टक्के उसाची लागवड झालेली आहे. अशा परिस्थित कारखान्यांसमोर गाळपाचा मोठा पेच निर्माण झाला आहे. जिल्ह्यात कारखान्याचे गाळप उद्दिष्टे पुढील प्रमाणे आहे. समृद्धी ४ लाख टन,समर्थ ५ लाख टन, सागर ३ लाख टन, बागेश्वरी ३ लाख टन , रामेश्वर ४ लाख टन या प्रमाणे १९ लाख मे. टनाचे उद्दीष्ठे आहेत. त्यातुलनेत जिल्ह्यात अत्यल्प ऊस असल्याने हा प्रश्न निर्माण झाला आहे.
गेटकेन उसावरच दारोमदार!
By admin | Updated: December 1, 2014 00:48 IST