जालना : जुन्या मोटारसायकलचा खरेदी व विक्रीचा व्यवसाय थाटून चोरीच्या मोटारसायकलींची पध्दतशीरपणे विल्हेवाट लावणाऱ्या एका टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व विशेष कृती दलाने शनिवारी पर्दाफाश केला. पोलिस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंह यांना एका खबऱ्याने या दोघांंच्या वाहन चोरीसंदर्भात माहिती दिली. ही माहिती मिळताच सिंह यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनंत कुलकर्णी, सहायक निरीक्षक विनोद इज्जपवार यांना संबंधितांविरुध्द कारवाईचे आदेश दिले. लगेचच स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागासह विशेष कृती दलाने हालचाली सुरु केल्या. त्या दोघा संशयितांवर पाळत ठेवली. तेव्हा काही गोष्टी समोर आल्या. या पथकाने खात्री पटताच प्रत्यक्षात कारवाई केली. गोविंंद शिंदे याने विविध जिल्ह्यांमधून वाहन चोरी करुन आणण्याचा सपाटा सुरु केला. ही वाहने तो विश्वंभर गुंजकर याच्याकडे सुपूर्द करण्यास सुरुवात केली. त्याने ती विक्रीचा सपाटा लावला. त्यासाठी गुंजकरने जुने वाहन खरेदी-विक्रीचे दुकानच उघडले होते. या दुकानातून तो सर्रासपणे चोरीची वाहने विक्री करीत होता. या पथकाने त्या दोघांना ताब्यात घेतले. व पोलिसी खाक्या दाखविला, तेव्हा या दोघांच्या ताब्यातून विविध कंपनीची ११ दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहे. एका दुचाकीला नंबर प्लेट नाही. त्यामुळे आता या वाहनांची ओळख केवळ इंजिन क्रमांकावरूनच पटू शकेल. या कारवाईत कुलकर्णी, इज्जपवार यांच्यासह जमादार विनायक कोकणे, विनोद गडधे, कैलाश शर्मा, संजय गवई, फुलचंद हजारे, राजू निर्मळ, सुनिल म्हस्के, मारोती शिवरकर, कृष्णा देठे, संदीप चिंचोले आदींनी केली. (प्रतिनिधी)
दुचाकी चोरी आणि विक्री करणारी टोळी गजाआड
By admin | Updated: September 21, 2014 00:24 IST