परंडा : सीना-कोळेगाव प्रकल्पातील पाणीसाठा मृतावस्थेत असून, भविष्यात हे धरण पूर्ण भरण्याची कुठलीही शक्यता नाही. धरण भरण्यासाठी २५ टीएमसी योजना पूर्ण करणे आवश्यक असून, याकरिता जलसंपदा विभागाची तातडीची बैठक घेवून उजनी -सीना-कोळेगाव बोगदा कामाला तातडीने निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी आ. राहुल मोटे यांनी पालकमंत्री डॉ. दिपक सावंत यांच्याकडे केली.सावंत यांनी शनिवारी सीना-कोळेगाव प्रकल्पातून परंडा शहरासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेच्या कामाची पाहणी केली. यावेळी आ. मोटे यांनी सीना-कोळेगाव प्रकल्पासंबंधीची सविस्तर माहिती सावंत यांना दिली. धरणाची उभारणी झाल्यापासून आजपर्यंत पाणीसाठ्याची काय स्थिती आहे, धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी काय उपाययोजना करायला हव्यात याबाबतची विवेचनही त्यांनी यावेळी केले. भूम, वाशीसह परंडा तालुका तीव्र दुष्काळाचा सामना करीत असून, जनावरांच्या चाऱ्याची स्थिती गंभीर झाल्याचे मोटे यावेळी म्हणाले. यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असून, चारा छावण्या सुरु करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, परंडा शहराला सद्यस्थितीत खासापुरी प्रकल्पातून पाणी पुरवठा केला जातो. या प्रकल्पातील पाणीसाठा आठ दिवसापूर्वी संपुष्टात आल्याने शहराला तीव्र टंचाईचा सामना करावा लागत आहे. या अनुषंगाने माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्यासह नगराध्यक्षा राजश्री शिंदे, उपनगराध्यक्ष सुभाषसिंह सद्दीवाल यांनी शहराला तातडीने टँकरने पाणीपुरवठा सुरु करण्याची मागणी केली. पालिकेतर्फे २० टँकर सुरु करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आल्याचेही सांगण्यात आले. यावेळी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख सूरज साळुंके, सभापती काशीबाई इतापे, उपसभापती मेघराज पाटील, जि. प. चे माजी बांधकाम सभापती धनंजय सावंत, तहसीलदार स्वरुप कंकाळ, गटविकास अधिकारी विजयसिंह नलावडे, तालुका कृषी अधिकारी जाधव, मुख्याधिकारी रामकृष्ण मोरे यांच्यासह मुकूल देशमुख, सुभाष शिंदे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
बोगदा कामासाठी निधी द्या
By admin | Updated: August 22, 2015 23:57 IST