वाशी : चोरट्यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर चार घरे फोडून सोन्याचांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा जवळपास अडीच लाख रूपयांचा मुद्देमाल लंपास केला़ ही घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली असून, या प्रकरणी वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़याबाबत पोलिसांनी सांगितलेली माहिती अशी की, शहरातील माळी गल्ली परिसरात राहणारे प्रविण शिवाजीराव उंदरे यांच्या घरी शुक्रवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे कटावणीच्या सहाय्याने कुलूप तोडून आत प्रवेश केला़ कपाटातील सोन्याचे तिन तोळ्याचे गंठन, दीड तोळ्याच्या अंगठ्या व दोघा भावाच्या पँन्टीच्या खिशातील एक लाख नऊ हजार रूपये घेऊन पोबारा केला. चोरी होताना एकासही जाग आली नव्हती़ झोपेतून उठल्यानंतर चोरी झाल्याचे कुटुंबाच्या निदर्शनास आले. उंदरे यांच्या घराशेजारील प्रजोत श्रीधर उंदरे यांच्या घरात चोरट्यांनी प्रवेश करून सोन्याचे २० मनी व पदक असा तेरा हजार पाचशे रूपयाचा ऐवज लंपास केला. तर बब्रुवान परमेश्वर जगताप, सोपान महादेव कवडे यांच्या घरातही प्रवेश करून घराची झाडाझडती घेतली़ मात्र, त्यांना तेथे मौल्यवान वस्तू अथवा पैसे मिळून आले नाहीत. घरातील सामाना मात्र अस्थाव्यस्त फ ेकून देऊन चोरटे निघून गेले. प्रविण उंदरे यांच्या तक्रारीवरून वाशी पोलिस ठाण्यात भादंवि कलम ४५७,३८० नुसार गुन्हा नोंद दाखल करण्यात आला आहे़ अधिक तपास पोलीस निरीक्षक शहाजी शिंदे हे करत आहेत. (वार्ताहर)
वाशी येथे रात्रीत चार घरे फोडली
By admin | Updated: October 25, 2014 23:48 IST