दत्ता थोरे , लातूरलातूर जिल्हा परिषदेचे मावळते अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे यांच्या कारकिर्दीला कर्तृत्वाचे कोंदण आहे. हाडाचा शिक्षक असलेल्या बनसोडे गुरुजींनी आपले गुरुजीपण जिल्हा परिषदेच्या कामात ठसठसीतपणे रुजविले. जणू जिल्हा परिषदेत ते हेडमास्टर सारखे वावरायचे. राज्याच्या राजकारणात माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांना हेडमास्तर म्हटले जायचे. तसे जिल्हा परिषदेचे हेडमास्तर राहीलेले अध्यक्ष कोण ? याचा इतिहास लिहीला जाईल तेव्हा दत्तात्रय बनसोडे हे नाव लातूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात अत्यंत आदराने घेतले जाईल. तर दुसरीकडे भक्कम राजकीय वारसा असतानाही त्यांच्या सोबतीने उपाध्यक्षपदाच्या खुर्चीत बसलेल्या अशोकरावांना कर्तृत्व दाखवायला संधी असूनही त्यांच्यातले उणेपण ठळकपणे दिसले. परंतु शांतताप्रिय जिल्हा ही असलेली ओळख त्यांनीही कधी मोडली नाही. वकूब दाखविता नाही तरी चालेल पण बट्टा लागू दिला नाही याचे श्रेय त्यांना दिलेच पाहीजे. उपाध्यक्ष म्हणून काम करताना आपल्यापेक्षा कमी राजकीय अनुभव आणि वारसा मागे असतानाही त्यांनी अध्यक्षांना काम करायला मोकळीक देऊन आणि त्यांच्या पदाचा मान राखून आपले वेगळेपणच नम्रपणे जपले. दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य असलेल्या बनसोडे गुरुजींना मागच्या निवडणुकीत दुसऱ्या टर्मला अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली. घराण्याचा भक्कम वारसा असलेल्या अशोकराव निलंगेकरांनाही उपाध्यक्ष म्हणून काम करता आले. रबर स्टँप असा शिक्का दत्तात्रय बनसोडे गुरुजींवर नियुक्तीवेळी होता. परंतु उपाध्यक्षांच्या तुलनेने त्यांनी बनसोडे नावाचा शिक्का वेळोवेळी हुकूम म्हणून वापरलाच. भक्कम राजकीय वारसा असतानाही जितका तो अशोकराव निलंगेकरांना वापरता आला नाही तितक्या ताकदीने बनसोडे गुरुजींनी निश्चितपणे वापरला. यापूर्वी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम केलेल्या दिलीपराव देशमुख, बब्रुवान काळे, छाया चिगुरे, साहेरा मिर्झा, ज्ञानोबा गुमडवार, पंडितराव धुमाळ या एकाहून एक अध्यक्षांचे भक्कम वारसदार म्हणून दत्तात्रय बनसोडे यांनी आपली निश्चित छाप पाडली. जि. प. च्या सर्वसाधारण सभा असो की कोणत्याही गुप्त वा जाहीर बैठका. देहाने कमी उंचीच्या असलेल्या बनसोडे गुरुजींनी आपली छाप पाडून पदाची उंची कधीच कमी होऊ दिली नाही. त्यांनी शांत बसायला सांगितले तर विरोधी पक्षाचे सदस्यही शांत होत इतका त्यांच्या शब्दाला निश्चितच मान होता. अशोकराव निलंगेकरांनीही आपला बरहुकूम खुबीने चालविला. निर्णय प्रक्रियेत कमी बोलताना त्यांनीही कामाला चांगले प्राधान्य दिले. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या दोघांमध्ये कधी विसंवादाचे राजकारण गेल्या अडीच वर्षात लातूरकरांना अनुभवायला मिळाले नाही. या दोघांच्या कारभाराचा जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना कधी त्रास झाला नाही, झालाच तर कामाला फायदा जरुर झाला असेल.या दोघांनी बदल्यांचे प्रस्ताव आॅनलाईन पध्दतीने करून कर्मचाऱ्यांना दिलासा दिला. यशवंत पंचायत राज योजनेत जिल्ह्याला राष्ट्रीय पातळीवर ७५ लाखाचा पहिला क्रमांक मिळवून दिला. स्वच्छता अभियानात मागची सलग दोन्ही वर्षे विभागात पहिले आणि राज्यात तिसरा क्रमांक मिळवून दिला. जिल्हा परिषदेची शिस्त आणखी मजबूत करीत लातूर जि. प. च्या कामधेनू दत्तक ग्राम योजना राज्याला राबविण्याचा मोह होईल इतक्या तत्परतेने राबविली. भाऊबिजेला बहिणीने भावाला शौचालयाचे ओवाळणी मागावी, हे गुरुजींचे आवाहन, वा शॉपिंग कॉम्प्लेक्सचा प्रस्ताव, जि. प. च्या जागा कुठे आहेत याची त्यांनी केलेली तपासणी आणि त्यांचे मालकीकरण, जि. प. च्या सर्व शासकीय इमारतींवर जलपुनर्भरण, वा रविशंकर परिवाराने केलेल्या जलसंधारणात जि़ प. चा सक्रीय सहभाग ही या जोडगोळीची ठळक कामे होत. जिल्हा परिषद अध्यक्ष असलेले दत्तात्रय बनसोडे गुरुजी जेव्हा लोकसभेच्या रणांगणात होते तेव्हा मोहन माने यांनी ‘रबर स्टँप’ म्हणून त्यांच्यावर आगपखड केली होती. हा त्यांच्यावर पडलेला शिक्का जिल्हा परिषदेच्या राजकारणातही ते शंभर टक्के पुसू शकले नाहीत. बड्या नेत्यांच्या मर्जीतील नेत्यांना पदे मिळाली की ते ‘आम्ही ८० टक्के नेत्याचे जोडे उचलतो आणि उरलेले २० टक्के जनतेचे उचलतो’ हे जाहीरपणे बोलतात. जिल्ह्यात काही आमदारच अशी विधाने जाहीरपणे करतात.४गुरुजींनी हे जाहीरपणे बोलले नसले तरी आपल्या कामाच्या पध्दतीत शांतपणे पाळले ते ही शंभर टक्के. काहीसे ‘रिमोेट कंट्रोल’ वरचे रोबोट तर नाहीत ना अशी शंका घ्यावी इतकी श्रेष्ठींची निष्ठा त्यांच्या रोमरोमी होती आणि कारभार करताना ती ठळकपणे दिसायची. अर्थात राजकारणात याला पर्याय नसतो. स्वच्छता अभियानात जिल्ह्याला राज्यात पहिला नंबर मिळवून देणाऱ्या या जोडगोळीला आपल्या इमारतीतील स्वच्छता विभागाची दुरावस्था दूर करता आली नाही, हे दुर्दैवच.
कारकिर्दीला चार चाँद, तरीही ‘रबर स्टँप’चा शिक्का पुसता आला नाही !
By admin | Updated: September 21, 2014 00:29 IST