औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील (घाटी) शवागारात गेल्या काही दिवसांपासून दुर्गंधी येत आहे. या शवागाराची वातानुकूलित यंत्रणा अपुरी पडत असल्याचा हा परिणाम आहे. हे शवागार अत्यंत जुन्या पद्धतीचे आहे. त्यात शवपेट्या नसल्यामुळे तेथील स्ट्रेचरवर किंवा जमिनीवर मृतदेह ठेवलेले असतात. साधारणत: ८ ते १० मृतदेह शवागारात असतात. घाटीत रोज सरासरी १० ते १५ शवविच्छेदन होतात. यातील काही मृतदेह पोलिसांना रस्त्याच्या कडेला, धर्मशाळा, रेल्वेस्टेशन, बसस्थानक, घाटी परिसरात बेवारस अवस्थेत आढळलेले असतात. रेल्वेसमोर आत्महत्या करणार्यांचे प्रमाण जास्त आहे. मृत्यूच्या सहा तासांनंतर मानवी देह कुजायला सुरुवात होते. बर्याचदा पोलिसांना कुजलेला व बेवारस मृतदेह सापडतो. मृतदेह कुजलेला असला तरी किमान चार दिवस तो शवागारात ओळख पटविण्यासाठी ठेवला जातो. चांगल्या अवस्थेतील मृतदेह आठ ते दहा दिवस शवागारात राहतो. तो अधिक कुजतो. शवविच्छेदन केलेल्या शरीरातून दुर्गंधी यायला सुरुवात होते. शवागारात सर्व मृतदेह उघडे ठेवलेले असल्यामुळे एका सडलेल्या मृतदेहामुळे अन्य मृतदेहही लवकर कुजण्यास सुरुवात होते. परिणामी शवागारात दुर्गंधी पसरलेली असते. या शवागाराचे दार उघडताच दुर्गंधीचा भपकारा येतो. मृतदेह ठेवण्यासाठी स्वतंत्र शीतपेट्या तेथे नाहीत, असे सूत्रांनी सांगितले. शवागाराचे तापमान २ अंश सेल्सिअस असणे आवश्यक आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यास शवागाराचे तापमान घसरते आणि मृतदेह अधिक वेगाने कुजू लागतात. काही जण नातेवाईकाचा मृतदेह एक किंवा दोन दिवस शवागारात ठेवतात, तेव्हा त्यांना शवागाराचा वीजपुरवठा खंडित झाल्यास किंवा अन्य तांत्रिक कारणामुळे शीतयंत्रणा बंद पडल्यास मृतदेह कुजू शकतो, हे मुद्दाम सांगितले जाते.
घाटी रुग्णालयाच्या शवागारात दुर्गंधी
By admin | Updated: May 26, 2014 01:16 IST