सोयगाव : कोविड संसर्गाची दुसरी लाट सोयगाव तालुक्याच्या दरवाज्यावर धडक मारत आहे. कोणत्याही परिस्थितीत या कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेला सीमेवरच थांबवा, अशा सूचना तहसीलदार प्रवीण पांडे यांनी सोमवारी कोरोना संसर्ग बैठकीत दिल्या. सोयगाव तालुक्यात मंगळवारपासून ग्रामीण भागात मास्क आवश्यक आहे. त्यासाठी पोलीस विभागाने तातडीची दखल घेऊन मास्क नसल्यास प्रथम सूचना द्या, न ऐकल्यास पाचशे रुपये दंड करा, अशा सूचना दिल्या आहेत.
अनेकजण मास्क नाकाच्या खाली केवळ तोंडावर ठेवतात, अशा लोकांनाही आता दणका बसणार असून, त्यांना दोनशे रुपये दंड ठोठावला जाणार आहे. कोविड लसीकरणा बाबतीत नियोजन करून तातडीने गुरुवारपासून फ्रंटलाइन कर्मचारी महसूल आणि कोविड योद्धे यांना २८ फेब्रुवारीपर्यंत लसीकरण करून पहिला टप्पा संपवा, असेही त्यांनी सांगितले. यावेळी गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे, वैद्यकीय अधिकारी डॉ. केतन काळे, पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ, आरोग्य विभागाचे अजय डोंगरे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
पथक तैनात
कोरोना नियमांचे पालन करण्यासंदर्भात प्रशासनाकडून पथक तयार केले जाणार आहे. तसेच गावनिहाय विवाह समारंभाची माहिती गावातील पोलीस पाटलांनी संकलित करून संबंधित कुटुंबीयांना समज देऊन विवाह साध्या पद्धतीने साजरा करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहे. शहरात मास्कबाबतची मोहीम नगरपंचायतीने व्यापक करावी, असेही त्यांनी सांगितले. तालुक्यात नागरिकांनी शिस्त पाळून आठवडाभर सहकार्य केल्यास तूर्तास लॉकडाऊन न करण्याचा निर्णय घेतला आहे.
शेजारील जिल्ह्यात कोरोनाचा प्रवेश
सोयगाव तालुक्याच्या शेजारी असलेल्या जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा दुसऱ्या टप्प्याचा शिरकाव मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांची तपासणी करण्यासाठी आरोग्य विभागाचे पथक तैनात करण्यात आले आहे. जळगाव जिल्ह्यात नागरिक गेल्यास त्याची माहिती घेण्याचे सांगितले आहे.
छायाचित्र ओळ : सोयगावला कोरोनासंदर्भात बैठकीत मार्गदर्शन करताना तहसीलदार प्रवीण पांडे व इतर.
220221\ynsakal75-053808388_1.jpg
सोयगावला कोरोना संदर्भात बैठकीत मार्गदर्शन करतांना तहसीलदार प्रवीण पांडे व इतर.