दत्ता थोरे , लातूरलातूरच्या पहिल्या महापौर स्मिता खानापुरे व उपमहापौर सुरेश पवार यांचा कार्यकाळ आज संपतो आहे. महापालिका निर्मितीनंतर पहिल्या महापौर व उपमहापौर म्हणून या दोघांच्या नावाची ऐतिहासिक नोंद झाली. पण, तितक्याच उत्साहाने शहराचा गाडा हाकून आपले नाव कर्तृत्वाच्या वहीत सुवर्णअक्षरांनी नोंदविण्यात दोघेही कमी पडले. वर्गात मुलांचे उज्ज्वल भविष्य घडविणाऱ्या प्राध्यापक खानापुरेंना तर शहराचे भविष्य घडविण्याची आयती संधी चालून आली होती. परंतु अंगी निर्णयांचे धाडस नसल्याने ‘रबर स्टँम्प’ म्हणूनच वावरत त्यांनी अडीच वर्षे कोणत्याही बड्या वादाविना काढली. जसे महापौरांचे तसेच उपमहापौरांचे. शहराचा गाडा त्यांना भलेही पुढे नेता आला नाही, पण अनंत संकटात मागे तरी नेला नाही यासाठी मात्र त्यांना पैकीच्या पैकी गुण द्यावेच लागतील. राज्य शासनाने महापालिका दिली तेव्हा लातुरकरांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. स्व. विलासराव देशमुखांच्या प्रयत्नाने झालेली महापालिका दृष्टीक्षेपात आपली होती. पहिल्याच जंगी निवडणुकीत काँग्रेसने बहुमत मिळवून महापौर, उपमहापौर पदे मिळविली. अल्पसंख्याक समाजाच्या आणि विशेष करुन महिला म्हणून प्रा. स्मिता खानापुरे यांना पहिल्या महापौर पदाचा तर सुरेश पवार सारख्या जाणकार कार्यकर्त्याच्या गळ्यात उपमहापौर पदाची माळ पडली. माणसांच्या आयुष्यात जसे पहीले पाऊल, पहीले प्रेम, पहीले घर, पहीले मूल याची उत्सुकता असते तशीच संस्थांच्या वाटचालीत पहीले कार्यालय, पहीला अधिकारी, पहीला पदाधिकारी यांचे असते. परंतु ‘पहिल्या’चा मान मिळूनही खानापुरे-पवार या दुकलीची कारकिर्द कोरड्या उत्साहाची गेली. खरेतर पहिला उत्साह कसा कर्तृत्वाने बहरलेला लागतो. परंतु यांच्या कारकिर्दीत मनपा नगरपरिषदेच्या जुन्या चौकटीतून बाहेरच येऊ शकली नाही. तिला बाहेर काढण्यात या दोघांनाही सपशेल अपयश आले. इमारती समोरचा नगरपरिषद हा बोर्डसुध्दा बदलायला दोन वर्षे लागावीत हे दुर्दैवंच नव्हे काय ? आजही शहरात ठिकठिकाणी नगरपरिषदेच्या नावाचे फलक ठळकपणे दिसताहेत. सभागृहातल्या दशावताराची तर कल्पनाच न केलेली बरी. राजदंड नको, राजमुद्रा नको दैनंदिन कामकाज नियमावली नको. शहरात स्वच्छता नको, पाणी नको, १५-१५ दिवस पथदिवे नको, मुताऱ्या नको, ग्रीन बेल्टला जागा नको. या गोष्ट सुरळीत करायला कशाला हवेत श्रेष्ठींचे आदेश ? परंतु दुर्दैव ‘गढीहून आदेश निघाल्याशिवाय नाही...’ या गैरसमजातच महापौर, उपमहापौर वावरले. खरेतर लातूरकरांसमोर प्रश्नांचे इमले होते. वरवंटी आणि नांदगावकरांनी कचरा उचलणे बंद केल्यावर शहरभर ढिग असताना महापौरांची ‘ग्रँड’ पार्टी चर्चेत आली. महापौरांच्या पतीचा मनपातील वावर खटकणाराच असायचा. गोंधळ आणि मनपा यांचे नाते रेल्वेच्या पटरीसारखे राहीले. २५ वर्षाचा उपमहापौर सुरेश पवार यांचा अनुभवही नव्या मनपासाठी वांझोटा ठरला. या दोघांचा ना पदाधिकाऱ्यांवर अंकुश राहीला ना प्रशासनावर. पहिल्यांदा खुर्च्यात बसलेल्यांनी किमान मनपाची मुद्रा, दैनंदिन कामकाज नियमावली याचे तरी नियम करावेत. मानद शिष्टाचाराचा भाग असलेला राजदंडही सभागृहात आणता आला नाही. मानापमान नाट्यावरुन दोन वेळा रुसलेल्या महापौर श्रेष्ठींकडे या गोष्टींसाठी कधी आग्रह करु शकल्या नाहीत. त्यांनी घोषणाही केल्या. स्व. विलासरावांचे साई पर्यटन क्षेत्रात स्मारक असेल व स्पर्धा परिक्षा केंद्र असेल की महिला दरबार. साऱ्या घोषणा हवेतच विरल्या़जमेची बाब म्हणजे चार झोन झाले. मनपाचा आकृतीबंध मंजूर झाला. परंतु झोन कर्मचाऱ्यांविना आणि आकृतीबंध लक्षाविना उपेक्षित राहीले. यांचे दुर्लक्ष यांच्यासह श्रेष्ठींनाही बदनाम करुन गेले. परंतु तरीही यांच्या नावाची पहिले, महापौर, उपमहापौर म्हणूनची नोंद ऐतिहासिक.
पहिल्या महापौर, उपमहापौरांचा कार्यकाळ कोरड्या उत्साहाचा..!
By admin | Updated: November 20, 2014 00:47 IST