संतोष हिरेमठ, औरंगाबाद‘रेल्वे प्रवासादरम्यान ज्वालाग्राही पदार्थ नेऊ नये,’ अशी केवळ घोषणा करून रेल्वे प्रशासन आगीच्या घटना रोखण्याची जबाबदारी झटकत असल्याची परिस्थिती अनेक रेल्वेगाड्यांमध्ये पाहणी केल्यानंतर दिसून येत आहे. एक्स्प्रेस रेल्वेच्या द्वितीय आणि अनारक्षित बोगींमध्ये, त्यातही पॅसेंजर गाड्यांमध्ये सर्वसामान्य प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आग वेळीच रोखण्यासाठी आवश्यक असणाऱ्या साहित्यांची वानवा दिसून येत आहे. आवश्यक ती यंत्रणा पुरविण्याकडे रेल्वे प्रशासन कानाडोळा करीत असल्याने ‘बर्निंग ट्रेन’चा धोका मात्र दिवसेंदिवस वाढत आहे.सर्वसामान्य प्रवाशांपासून तर उच्च श्रेणीच्या प्रवाशांकडून रेल्वेतून प्रवास करण्यास प्राधान्य दिले जाते. त्यामुळे वर्षभर प्रवाशांची रेल्वेगाड्यांना मोठी गर्दी दिसून येते; परंतु सर्वसामान्य प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित होईल याकडे साफ दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र विविध रेल्वेगाड्यांमधील परिस्थितीवरून दिसून येत आहे. उच्च श्रेणीच्या वातानुकूलित बोगींमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अधिक दक्ष असल्याचे चित्र आहे. बहुतांश एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांच्या वातानुकूलित बोगींमध्ये अग्निरोधक साहित्य दिसून येते; परंतु द्वितीय श्रेणीत ही यंत्रणा अपवादानेच दिसून येते. त्यातही पॅसेंजर रेल्वेगाड्यांमध्ये या यंत्रणेची वानवाच दिसून येते. रेल्वे इंजिन, गार्डची बोगी, पेंट्री कार या ठिकाणीच ही अग्निशमन यंत्रणा ठेवण्याची तसदी प्रशासन घेत आहे. रेल्वेमध्ये दुर्दैवाने आग लागल्यास अग्निशमनविरोधी सिलिंडरमधील कार्बन डायआॅक्साईड गॅसद्वारे परिस्थितीवर वेळीच नियंत्रण येण्यास मोठी मदत होते; परंतु प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे रेल्वेगाड्यांचा प्रवास जीवावर बेतत आहे.
पॅसेंजर गाड्यांमध्ये अग्निरोधक साहित्याची वानवा
By admin | Updated: October 27, 2014 00:11 IST