औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे सिडको बसस्थानक चौक (जळगाव टी-पॉइंट) येथे उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाच्या पायाभरणीच्या कामास शुक्रवारपासून सुुरुवात झाली आहे. शहरातील महत्त्वाचा आणि सर्वाधिक वर्दळीचा रस्ता म्हणून जालना रोड ओळखला जातो. जालना रोडच्या दोन्ही बाजूंनी शहराचा विस्तार झाल्याने वाहनचालकांना या रोडचा वापर करावा लागतो. त्यामुळे हा रस्ता आज शहराची लाईफलाईन बनली आहे; परंतु गेल्या काही वर्षांत वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी जालना रोड अपुरा पडू लागला. यामुळे या रस्त्यावर वाहनचालकांना जागोजागी वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे जालना रोडवरील सिडको बसस्थानक चौक (जळगाव टी-पॉइंट), मोंढानाका आणि महावीर चौक येथे उड्डाणपूल उभारण्याचे काम हाती घेण्यात आले. त्यामुळे जालना रोडवरील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी हे उड्डाणपूल आगामी कालावधीत महत्त्वाचे ठरतील. या तिन्ही उड्डाणपुलांचे डिझाईन आयआयटी मुंबईकडून टप्प्याटप्प्याने मंजूर होणार असून, उड्डाणपुलांच्या पायाभरणीसाठी पिलरचे डिझाईन उपलब्ध झाले आहेत. सिडको बसस्थानक चौकात उड्डाणपुलाचे काम सुरू असताना वाहतूक सुरळीत राहण्यासाठी या मार्गावर दोन्ही बाजूंनी पर्यायी रस्त्यांच्या कामाचेही नियोजन करण्यात आले आहे. पर्यायी रस्त्याच्या कामानंतर आता या उड्डाणपुलाच्या पायाभरणीच्या कामासही सुरुवात झाली आहे. उड्डाणपुलाच्या पायाभरणीकरिता खोदकाम करण्यासाठी या ठिकाणी लोखंडी बॅरिकेड्स उभारण्यात आले आहेत.
अखेर कामास सुरुवात
By admin | Updated: September 14, 2014 00:20 IST