लातूर : येथील बार्शी रोडवरील नव्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेली लॉन पाण्याअभावी सुकू लागली होती. याबाबत मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने दररोज या लॉनभोवती घुटमळणाऱ्या चमुने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन पाणी फवारण्याची विनंती केली. परंतु तरीही लॉनवर पाणी पडत नसल्याचे पाहून या चमुनेच अखेर वर्गणी करुन लॉनवर पाणी टाकले. जसे नवे जिल्हाधिकारी कार्यालय बार्शी रोडवरील नियोजित आयुक्तालयाच्या इमारतीत आले तसे येथील वातावरण प्रसन्न बनले आहे. समोर सुशोभिकरणातून लॉनही उभारण्यात आली. या इमारतीच्या समोरच्या ट्रॅकवर दररोज पहाटे पाच ते सकाळी आठ वाजेपर्यंत मोठ्या संख्येने नागरिक ‘मॉर्निंग वॉक’ला येतात. चार-पाच राऊंड मारुन शरिर हलके करतात आणि तेथीलच लॉनवर बसून थोडीशी योगासने करुन हास्यस्फोट आणि गप्पांमधून मन हलके करतात. या साऱ्या ‘वॉकींग गँगला’ ही मऊ मुलायम लॉन चीच सतरंजी होती. परंतु गेल्या काही दिवसांपासून अपुऱ्या पाण्यामुळे हजारो रुपये खर्चून उगविलेली लॉन पाण्याअभावी सुकू लागली होती. ही बाब ‘मॉर्निंग वॉक’ला येणाऱ्या चमुने जिल्हाधिकाऱ्यांच्या कानावर घातली. परंतु तरीही पाणी लॉनवर पडत नसल्याने अखेर प्रशासनाच्या आदेशाची वाट न पाहता थेट वर्गणी करीत टँकरचे विकतचे पाणी आणून लॉनला दिले. या चमुत मांजरा सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, पंचायत समितीचे उपसभापती लक्ष्मण पाटील, डॉ. नितीन भराटे, उद्योजक कमलाकर जाधव, आबासाहेब जाधव, अजित चव्हाण, वैभव पतंगे, अॅड. व्यंकट पिसाळ, प्रा.डॉ. संग्राम मोरे, मैत्रजित रणदिवे, विनोद लोमटे आदींचा समावेश आहे. (प्रतिनिधी)लॉनला पाणी... बार्शी रोडवरील नव्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील लॉन पाण्याअभावी वाळत होती. मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या चमूने वर्गणी जमा करून टँकरने पाणी दिले.
अखेर ‘मॉर्निंग वॉक’ला येणाऱ्या चमुनेच विकतचा टँकर ओतला
By admin | Updated: December 4, 2014 00:53 IST