उस्मानाबाद : जिल्ह्यातील सावकारांनी दोन वर्षात २३ हजार ११९ शेतकऱ्यांना १ कोटी ६३ लाख ६७ हजाराचे कर्ज वाटप केलेल आहे. मात्र हे कर्ज शेतीसाठी दिलेले नसल्याने याचा शेतकऱ्यांना कसा फायदा होणार? असा प्रश्न ‘लोकमत’ने बुधवारी उपस्थित केला होता. या वृताचे पडसाद विधानसभेत उमटले. अखेर शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकाराकडून कुठल्याही कारणासाठी कर्ज घेतले तरीही ते शासनाकडून भरले जाईल, असे स्पष्टीकरण शासनाने दिले आहे. जिल्ह्यात परवानाधारक सावकारांची संख्या १०४ आहे. या सावकारांनी दोन वर्षात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप केले आहे. मात्र महाराष्ट्र सावकारी अध्यादेश २०१४ अन्वये खाजगी सावकारांना परवाना देत असताना, शेतीसाठी कर्ज पुरवठा करता येणार नाही, अशी अट असल्याने या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार कशी? असा प्रश्न उपस्थित झाला होता. बुधवारी ‘लोकमत’ने याच अनुषंगाने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले. त्यानंतर आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी हा मुद्दा ‘पाँईट आॅफ इन्फर्मेशन’ च्या माध्यमातून विधानसभेत उपस्थित केला. शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकाराकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड सरकार करेल, अशी घोषणा करण्यात आली आहे. मात्र बिगर शेती कारणासाठी घेतलेले कर्ज सरकार फेडेल का? याबाबत संभ्रमाची स्थिती असल्याचे आ. पाटील यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. यावर शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकाराकडून कुठल्याही कारणासाठी कर्ज घेतले असेल तर ते मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार शासनाकडून भरले जाईल, असे स्पष्ट उत्तर संबंधित मंत्र्यांनी दिल्याने आता जिल्ह्यातील आठ हजारापेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला आहे. (प्रतिनिधी)४सन २०१४ मध्ये उस्मानाबाद तालुक्यातील १९३५, तुळजापूर तालुक्यातील १७२३, उमरगा १३२९, लोहारा ६६७, भूम ६८५, परंडा, ८९८, कळंब ४६५ तर वाशी तालुक्यातील ३२९ शेतकऱ्यांनी विविध कारणासाठी खाजगी सावकाराकडून कर्ज घेतले आहे तर मागील दोन वर्षात जिल्ह्यातील २३ हजार १७९ शेतकऱ्यांना खाजगी सावकारांनी १ कोटी ६३ लाख ६७ हजार रुपयाचे कर्ज दिलेले आहे. शासनाच्या या स्पष्टीकरणामुळे या सर्व शेतकऱ्यांना आता कर्जमाफी मिळण्याची शक्यता आहे. ४‘शेतकरी अन् सावकारालाही नाही फायदा’ या शिर्षकाखाली ‘लोकमत’ने बुधवारी वृत्त प्रसिद्ध केले होते. शेतीसाठी एकाही शेतकऱ्याला कर्ज दिलेले नसल्याने शासनाच्या कर्ज माफीचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फायदा होणार का? असा प्रश्न या वृत्तातून उपस्थित करण्यात आला होता. याची दखल घेत आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी विधानसभेत पॉर्इंट आॅफ इन्फर्मेशन’ चा मुद्दा उपस्थित केला. अधिवेशन सुरू असताना एखाद्या महत्वाच्या घडलेल्या घटनेसंदर्भातील माहिती सभागृहाला अवगत करण्याची मुभा सदस्यांना असते, अशी माहिती देण्याकरिता वरील आयुधाचा वापर केला जातो.
शेतकऱ्यांचे सावकाराकडील कर्ज फेडणार
By admin | Updated: December 18, 2014 00:35 IST